Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘सोशल मीडिया मस्त आहे!’

पहिल्या मराठी समाज माध्यम संमेलनात पहिल्या दिवशीच्या चर्चासत्रातील सूर

मुंबई : सोशल मीडियावर आजची तरुणाई अधिकाधिक वेळ घालवताना दिसते. त्यामुळे हे माध्यम टाईमपासचे किंवा काम नसलेल्यांसाठी आहे असा सूर असतो. मात्र याच सोशल मीडियाच्या माध्यमातून विधायक कामही करता येऊ शकते.  त्यामुळेच आजचा ‘सोशल मीडिया मस्त आहे!’ अशी प्रतिक्रिया समाज माध्यम संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या वेगवेगळ्या चर्चासत्रात उमटली.

सामान्य जनतेच्या परिवर्तनात महत्वाचे योगदान देणाऱ्या समाज माध्यमांचा सकारात्मक व विधायक कार्यासाठी वापर होणे आवश्यक आहे. या समाज माध्यम वापरकर्त्यांना एकत्र आणून या विषयावर सकारात्मक सर्वांगीण चर्चा घडविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र सायबर, राज्य मराठी विकास संस्था, आणि पुण्यातील डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय ‘मराठी समाज माध्यम’ संमेलन आज आणि उद्या मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित करण्यात आले आहे.

“सोशल मीडिया मस्त आहे” अशा शब्दांत लेखक आणि कवी प्रसाद शिरगावकर यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अनुभवांना शब्दबद्ध केले. श्री.शिरगावकर यांनी वीस वर्षांचा समाजमाध्यमांचा प्रवास उलगडताना या काळातील प्रवाह आणि अनुभव यावेळी मांडले.

सोशल मीडियावर झालेल्या उल्लेखनीय गोष्टी या अनुभव कथनाच्या कार्यक्रमात आकाश बोकमूरकर यांनी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना सोशल मीडियाचा केलेला वापर सांगितला. पूरग्रस्तांना समाज माध्यमाद्वारे तातडीची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतानाच, त्यांना अन्नधान्याबरोबरच आता घरासाठी मदत मिळावी म्हणून समाजमाध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच कार्यक्रमात मराठी मंडळींना एकत्र येण्यासाठी, मराठीचा वापर वाढून कला-गुणांना वाव मिळावा यासाठी ट्विटरसंमेलन आयोजित केले जाते,त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो असे ट्विटरसंमेलनाचे आयोजक स्वप्निल शिंगोटे यांनी सांगितले. यावेळी सातारा हिल मॅरॅथॉनचे आयोजक डॉ.संदीप काटे यांनी आज या मॅरेथॉनला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामध्ये सोशल मीडियाचा किती महत्त्वाचा वाटा आहे, ते उलगडून सांगितले. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा योग्य वापर आवश्यकच आहे. आपल्याकडे समाज माध्यम वापरण्याचे वय, निकष नाहीत मात्र परदेशात व्हॉटसॲप 16 वर्षांनंतर वापरण्याचा नियम असल्याचे उन्मेश जोशी यांनी सांगितले.

दुपारच्या सत्रात स्टँडअप कॉमेडियन सावनी वझे यांनी ग्लोबलायझेशनची व्याख्या किती विस्तारली आहे, हे आपल्या स्टँडअप कॉमेडीतून उपस्थितांना सांगितले. वेगवेगळ्या समाज माध्यमांचा वापर करताना आजही अनेकांची किती त्रेधातिरपिट होते हे त्यांनी सांगितले.

‘नेटवर्किंग ते मीडियम, ऑफलाईन ते ऑनलाईन’ या विषयावर बोलताना मटा ऑनलाईनचे संपादक हारिस शेख यांनी नवे काय, वाचकांना नेमके हवे काय आणि वृत्तपत्रांनी नेमके मांडायचे काय या विषयीचा उहापोह केला.

‘माझी expression, माझंimpression’ चर्चासत्रास  महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत तसेच यजुर्वेंद्र महाजन, डॉ.श्रुती पानसे, अमोल देशमुख, श्रीकांत जाधव यांनी सहभाग घेतला.

नकारात्मक पोस्टपासून, खोट्या समाज माध्यम खात्यापासून दूर रहा, आपली फसगत तर होत नाही ना हे तपासून पहा असे बोल भिडू पोर्टलचे संस्थापक श्रीकांत जाधव यांनी सांगितले. समाज माध्यमाबद्दल अनेकजण नकारात्मक असतात पण सकारात्मकतेकडेही तितकेच पाहिले पाहिजे त्यावर विचार करायला हवा. नवीन रचनात्मक कामांना समाज मान्य करतोय. अनेक शोध लागत गेले पण यातील चांगलं-वाईट हे आपण घ्यायला हवे असे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत यांनी सांगितले. डॉ.श्रुती पानसे यांनी लहान मुलांना समाज माध्यमांपासून दूर ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद केले. तर अमोल देशमुख यांनी कोणत्याही माध्यमांचा आपल्यावर अतिरेक होत नाही ना हे तपासून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

‘समाजाची दशा, दिशा आणि दिशांतरे’या विषयावरील परिसंवादात राजकीय विश्लेषक शेफाली वैद्य, राजू परूळेकर,बीबीसी मराठीचे मुख्य संपादक आशिष दीक्षित, ब्लॉगर आणि इतिहास अभ्यासक सौरभ गणपत्ये सहभागी झाले. प्रदीप लोखंडे यांनी चर्चासत्राचे समन्वयन केले.

समाज माध्यमांमुळे पारंपरिक माध्यमांमधून दिल्या जाणाऱ्या माहितीची पुनर्तपासणी करण्याची संधी सर्वसामान्यांना प्राप्त झाली आहे असे मत शेफाली वैद्य यांनी व्यक्त केले. बीबीसी मराठीच्या आशिष दीक्षित यांनी सांगितले की, बीबीसी या संस्थेने आपली विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. सौरभ गणपत्ये यांनी सांगितले, पारंपरिक मीडिया आणि सोशल मीडिया एकमेकांना पूरक असून कोणत्याही माध्यमातील बातमी पूर्ण न वाचता त्यावर प्रतिक्रिया देण्याची सवय वाढली आहे. बातमीकडे वाचक आकृष्ट होण्यासाठी नेमक्या शब्दात बातमीच्या मजकुराबरोबरच बातमीचा मथळाही तितकाच आकर्षक असणे गरजेचे आहे, असे राजू परुळेकर यांनी सांगितले.

Exit mobile version