Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे जनजीवन पूर्वपदाच्या दिशेने

विभागात 23 कोटी 71 लाख 40 हजाराचे सानुग्रह अनुदान वाटप

पुणे : मदत व पुनर्वसनासाठी सर्वच आघाड्यांवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचे जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. एकीकडे सानुग्रह अनुदानाचे वाटप जलदगतीने सुरू असतानाच गावातील स्वच्छता,रस्ते-पूल दुरूस्ती, वीज, पाणी पुरवठा,वैद्यकीय सेवा आदी अत्यावश्यक सेवाही पुरविण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला. दोन दिवसांपासून आपण या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे स्पष्ट करून डॉ.म्हैसैकर म्हणाले,कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तीन गावे वगळता अन्य सर्व गावांचा संपर्क प्रस्थापित झाला आहे.

शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील बाधित कुटुंबांना 10 हजार तर शहरी कुटुंबांना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. यापैकी 5 हजार रुपये रोख स्वरुपात बाधित कुटुंबाला वाटण्याचे काम सुरु असून उर्वरीत रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे विभागात 47 हजार 428 बाधित कुटुंबांना 23 कोटी 71 लाख 40 हजार रुपयांची रोख रकमेचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 12 कोटी 50 लाख 60 हजार रुपये, सांगली जिल्ह्यात 10 कोटी 54 लाख 75 हजार, सातारा जिल्ह्यात 28 लाख 30 हजार, पुणे जिल्ह्यात 17 लाख 50 हजार तर सोलापूर जिल्ह्यात 20 लाख 25 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

तसेच प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू व10 किलो तांदूळ  याप्रमाणे पुणे विभागातील 36 हजार 53 कुटुंबांना गहू व तांदुळ प्रत्येकी 3605.3 क्विंटल तर 13 हजार 31 लिटर केरोसिनचे वाटप करण्यात आले आहे.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी कमी झाली असून त्या धोकापातळीच्या खाली वाहत आहेत.

या पुरामुळे सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 104 गावे बाधीत असून यामधील 47 हजार 475 कुटुंबातील 1लाख 89 हजार 900 व्यक्ती स्थानांतरील असून त्यांची 30 तात्पुरत्या निवारा शिबीरात व्यवस्था करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 375 गावे बाधीत असून 4 लाख 7 हजार 531 लोकांना स्थानांतरीत करून त्यांची 151 तात्पुरत्या निवारा शिबीरात व्यवस्था करण्यात आली आहे.

पुरामुळे संपर्क तुटलेल्या सांगली जिल्ह्यातील सर्व गावांचा संपर्क पूर्ववत झाला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील केवळ तीन गावे अजूनही पुराच्या पाण्याने वेढली असून यामधील 8 हजार 196 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

तसेच रस्त्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सांगली जिल्ह्यातील 41 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 75 रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहेत.

बँकींग सेवाही पूर्वपदावर येत आहे. आतापर्यंत सांगली जिल्ह्यात 253 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 442 एटीएम सेवा सुरू करण्यात यश आले आहे.

पूरग्रस्तांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळण्याच्या दृष्टीने दोन्ही जिल्ह्यात 478 वैद्यकीय पथके अहोरात्र सेवा देत आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यात 237,कोल्हापूर जिल्ह्यात 169, सातारा जिल्ह्यात 72 वैद्यकीय पथकांचा समावेश आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे पुणे विभागातील एकूण 55 लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 27,कोल्हापूर जिल्ह्यातील 10, सातारा जिल्ह्यातील 8, पुणे जिल्ह्यातील 9 तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. विभागातील तीन लोक बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे.

पुराच्या तडाख्यात गाय व म्हैसवर्गीय 7 हजार 847 जनावरे, 1 हजार 65 शेळ्या-मेंढ्या तर 166 लहान वासरे व गाढवांचा मृत्यू अथवा बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात 5 बचावपथके तैनात असून 9 बोटी व 82जवानांचा समावेश आहे.

विविध संस्था व व्यक्तींकडून विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी करिता 6 लाख 61 हजार 311 रुपयांचे धनादेश जमा झाले आहेत. या व्यतिरिक्त वस्तूरूपातील मदतीचाही समावेश आहे. आजपर्यंत सांगली जिल्ह्यासाठी 46 ट्रक तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी 44 ट्रक असे एकूण 90 ट्रकद्वारे मदतीचे साहित्य पाठविण्यात आले आहे.

पुरामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाच्या माध्यमातून युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महावितरणच्या पुणे, बारामती परिमंडळातून 48 पथके कोल्हापूर येथे तर 12 पथके सांगली जिल्ह्यात पाठविण्यात आली असून त्यांचे काम सुरू आहे. या पथकांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील 13 उपकेंद्र, 2 हजार 894 रोहित्र दुरूस्त करण्यात आले असून एकूण 1 लाख 30 हजार 462 ग्राहकांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 26 उपकेंद्रे, 3 हजार 818 रोहित्रे दुरूस्त करण्यात आली असून 1 लाख 84 हजार 822 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरूळीत करण्यात महावितरणला यश आले आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे पुरेशा साहित्याची उपलब्धता करण्यात आली आहे.

तसेच पूरस्थितीमध्ये बंद झालेल्या सांगली जिल्ह्यातील 45 मार्गापैकी 39 मार्गावरील एसटीची वाहतूक पुर्ववत सुरु करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील बंद असलेल्या 31 मार्गापैकी 26 मार्गावरील एसटीची वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

त्याचबरोबर शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

Exit mobile version