सांगली : पुरामुळे बाधित झालेली घरे राहण्यासाठी सुरक्षित आहेत किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी पूर बाधित घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी अभियंत्यांच्या टीम तयार करण्यात आल्या असून या टीमने त्यांना नेमून दिलेल्या भागातील पूर बाधीत घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पूर बाधित घरांचे स्ट्रकचरल ऑडिट करण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या अभियंत्यांच्या टीमना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ.चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अतिरीक्त जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, उप विभागीय अधिकारी विकास खरात,उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, तहसिलदार शरद पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.चौधरी म्हणाले, पूर ओसरला असल्याने पूर बाधित नागरीक,ग्रामस्थ आपापल्या घराकडे परतू लागले आहेत. मात्र पुराने बाधित घरे कमकुवत झाली असलयाचे शक्यता असल्याने त्यांचे पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नेमण्यात आलेल्या टीमने वस्तूनिष्ठ ऑडिट करुन त्याबाबतचे दैनंदिन अहवाल सादर करावेत. स्ट्रक्चरल ऑडिट करताना अंशत: पडलेली घरे, पूर्ण पडलेली घरे असे वर्गिकरण करावे. पूर बाधित घरांचे स्ट्रकचरल ऑडिट करण्यासाठी अभियंत्यांच्या मदतीसाठी वालचंद महाविद्यालयाचे विद्यार्थी उपलब्ध होणार आहेत असे जिल्हाधिकारी डॉ.चौधरी म्हणाले.