सांगली : जिल्ह्यातील पूर ओसरला असून स्वच्छतेच्या कामाची गती वाढवा याचबरोबर पुराचे पाणी आलेल्या भागातील नियंत्रण पूररेषेचे काम त्वरित करा, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिले.
पूरपश्चात कामांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या, यामध्ये शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी त्यांनी सांगलीवाडी, स्टँड परिसर, पैलवान जोतिरामदादा पाटील कुस्ती आखाडा परिसर आदी विविध ठिकाणांना भेटी देऊन पूरपश्चात कामांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, उपविभागीय अधिकारी विकास खरात, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले यांच्या महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते.
सांगलीवाडी येथे त्यांनी पूरबाधित क्षेत्रात पाहणी करुन पूररेषेच्या खूणा तात्काळ करा असे सांगून डॉ.दिपक म्हैसेकर यांनी अन्नधान्य वाटप, सानुग्रह अनुदान वाटप, जनावरांना पशुखाद्य/चारा यांची उपलब्ध, गॅसची उपलब्धता आदीबाबत माहिती घेतली. तसेच पूरबाधितांना सानुग्रह अनुदान वाटप केले. पशूखाद्य/चारा वितरण करत असताना गोठ्यांची खात्री करुन त्याचे वितरण करा असे निर्देश दिले. यावेळी महानगरपालिकेने औषध फवारणी, स्वच्छता, चिखल/कचरा हटविणे आदी उपाययोजना अधिक गतिमान कराव्यात त्यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची मागणी करावी, ते उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगितले.