Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दारिद्र्य रेषेखालील लोकांनाही मोफत लस देण्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाने परवानगी दिली, तर राज्यात कोरोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. जालना जिल्हा रुग्णालयात आज कोरोना लसीकरणाची चाचणी अर्थात ड्रायरन आरोग्यमंत्री टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. दारिद्र रेषेखालील लोकांना देखील ही लस मोफत द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

कोरोना लस तयार करणाऱ्या एकूण ८ कंपन्यांपैकी दोन कंपन्यांनी लसीकरणाचा तिसरा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला असून, राज्य शासनाची संपूर्ण तयारी झाली आहे. त्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांचे पालन होते का, तसेच लसीकरणामध्ये येणाऱ्या अडचणी, संभाव्य चुकांची प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी, हा ड्रायरन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपुरात यशस्वीपणे ड्रायरन घेण्यात आला. त्या वेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत २५ जणांवर ‘ड्राय रन’च्या माध्यमातून लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यात आज यशस्वीरित्या ड्रायरन संपन्न झाला. जिल्हा सामान्य रुग्णालय, नवापुर उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे या ३ ठिकाणी या लसीकरणाची सराव चाचणी घेण्यात आली.

पुण्यात औंध येथील जिल्हा रुग्णालय, पुणे ग्रामीण भागातले माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपरी-चिंचवडचे जिजामाता आरोग्य केंद्र इथे प्रत्येकी २५ म्हणजेच ७५ लोकांवर हा सराव करण्यात आला. पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी आज ही माहिती दिली.

Exit mobile version