मुंबई : कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने मदतीची तीन वाहने पाठवण्यात आली आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथून काल सायंकाळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी हिरवी झेंडी दाखवून ही वाहने पूरग्रस्त भागाकडे रवाना केली. यावेळी विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पूरग्रस्तांना मदत आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शासन सर्व उपाययोजना करीत आहे. लोकांनीही पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन मंत्री श्री.रावल यांनी यावेळी केले.
पुरामुळे कोल्हापूर आणि सांगली भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी सर्वच स्तरावरून मदतीचा हात दिला जातो आहे. असाच मदतीचा हात अन्न व औषध प्रशासन विभागाने दिला आहे. या मदतीत पूरग्रस्तांसाठी पॅकेज पिण्याचे पाणी,ब्लिचिंग पावडर, फिनाइल लिक्विड,हँड ग्लोज, नोज मास्क, फूड पॅकेट इत्यादी जरुरीचे साहित्य पाठवण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे यापूर्वी पूरग्रस्तांसाठी एक लाख 68हजार लिटर पॅकेज ड्रिंक वॉटर, बिस्कीट, 2.50 टन तांदूळ, तुरदाळ, फळे व औषधी साहित्य अशी मोठ्या प्रमाणावर पाठवण्यात आले आहे. पूरग्रस्त भागात मदत पोहाेचवणाऱ्या साधारणतः 1500वाहन चालकांना जेवण, पूरग्रस्त कॅम्पमध्ये अंदाजे 550 लोकांना दररोज जेवण दिले जात आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने कोल्हापूर हॉटेल चालक-मालक संघ तर्फे दरोरोज 20हजार पूरग्रस्तांना जेवण दिले जात आहे.