नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरम इन्स्टिटयूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसींना भारतीय औषध प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानं देश जलद गतीनं कोरोनामुक्त व्हायला मदत होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत हा निर्णायक टप्पा असल्याचं सांगून प्रधानमंत्र्यांनी वैज्ञानिक आणि देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. भारतात बनलेल्या लसींच्या आपत्कालीन वापराची परवानगी प्रत्येक भारतीयासाठी गौरवाची गोष्ट आहे, तसंच यामधून आत्मनिर्भर भारताचं स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेनं करुणा आणि सेवाभावनेनं काम करणाऱ्या वैज्ञानिकांच्या सक्रियतेची प्रचिती मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कोरोना योध्यांनी प्रतिकूल परिस्थितीत अनेकांचे प्राण वाचवले असून ही वेळ देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी परिश्रम घेणारे आरोग्य कर्मचारी, वैज्ञानिक, पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांसह सर्व कोरोना योध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.