Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विविध उपक्रमांमधील ३० टक्के निधी महिला उद्योजकतेसंदर्भातील उपक्रमांसाठी वापरणार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधील ३० टक्के निधी महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी वापरणे, विद्यार्थीदशेतच महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थिनी उद्योजकता क्लब’ स्थापन करणे असे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास मंत्री श्री.मलिक म्हणाले की, सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी ४८ टक्के महिला असून देशातील एकूण उद्योजकांपैकी फक्त १४ टक्के महिला उद्योजक आहेत. राज्यात सध्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह, महाराष्ट्र स्टार्टअप आणि इनोव्हेशन यात्रा, नवउद्योजकांना पेटंट मिळविण्यासाठी तसेच गुणवत्ता परिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. आता यापुढे या सर्व उपक्रमांमध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल. यासाठी सोसायटीमध्ये स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्यात येईल.

महिला उद्योजकता कक्षामार्फत महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध शासकीय विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, नॅसकॉम, सीआयआय, फिक्की, असोचॅम आदी विविध नामांकीत संस्थांसमवेत भागीदारी करण्यात येईल. महिला बचतगट, महिला उद्योजक यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल. या उपक्रमांतर्गत महिलांना स्वव्यवस्थापन, आर्थिक व डिजिटल साक्षरता, व्यवसाय नियोजन व विकास आदी प्रशिक्षणे देण्यात येतील. याशिवाय महिला उद्योजकांसाठी नवीन इनक्यूबेटर्स स्थापित करणे, विद्यमान इनक्युबेटर्समार्फत महिला उद्योजकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणे, मार्गदर्शन करणे यावर हा कक्ष लक्ष केंद्रीत करेल. महिला उद्योजकांच्या चालविण्यात येणाऱ्या विकसीत स्टार्टअप्सच्या विस्तृतीकरणासाठी व त्यांच्या उद्योगास चालना देण्यासाठी विविध एक्सलरेटर कार्यक्रम राबविण्यात येईल. महिलांचे नेतृत्व असलेल्या स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात अर्थसहाय्य करणे, विकसीत स्टार्टअप्सना अधिकृत निधीकरिता स्टार्टअप परिसंस्थेतील गुंतवणूकदारांशी समन्वय साधून देणे, संशोधन व विकास क्षेत्रात तसेच तांत्रिक उद्योजकता क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या महिलांना विशेष अनुदान पुरविणे इत्यादी करिता महिला उद्योजकता कक्षामार्फत विविध उपक्रम व योजना राबविण्यात येतील, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

मुलींमध्ये विद्यार्थी दशेतच उद्योजकता विकसीत करण्यासाठी महिला उद्योजकता कक्षामार्फत राज्यातील विविध विद्यापीठे, महाविद्यालये, महिला महाविद्यालये आदींमध्ये विद्यार्थिनी उद्योजकता क्लब स्थापन करण्यात येईल. या क्लबमार्फत विद्यापीठस्तरावर तसेच आंतरविद्यापीठ, आंतरमहाविद्यालयीन स्तरावर परिसंवाद, प्रशिक्षणे, अभ्यासदौरे, मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्यात येतील. विद्यापीठांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या गांधी विचारधारा केंद्र, ग्रामीण अध्ययन केंद्र, महिला विकास कक्ष याप्रमाणे ‘विद्यार्थिनी उद्योजकता केंद्र’ स्थापन करण्यात येतील.

या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी कार्यकारी व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार असून यामध्ये कौशल्य विकाससह महिला-बालविकास, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग या विभागांचे सचिव, एसएनडीटी महिला महाविद्यालयाचे कुलगुरु, महिलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकीत संस्था, युएनडीपी, युएन वुमन, युनिसेफ यांचे प्रतिनिधी आदींचा समावेश असेल, अशी माहितीही मंत्री श्री.नवाब मलिक यांनी दिली.

००००

Exit mobile version