Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाच्या वतीने, बालवर्गासाठी खरेदी केलेल्या टेबल खुर्च्या खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याची “साद सोशल फाऊंडेशनची” मागणी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने बालवर्गासाठी टेबल खुर्च्या यांची मागणी भांडार विभागाकडे केली. शिक्षण विभागाच्या मागणी नुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भांडार विभागाच्या वतीने जुन २०२० मध्ये ही खरेदी करण्यात आली. खरेदीप्रक्रियेच्या करीता आलेल्या तीन निवेदनापैकी निलकमल कंपनीला हे काम देण्यात आले. प्लाॅस्टीक डेस्क, टेबल खुर्च्या असे मिळून १००० नग, तर चार खुर्चासोबत गोल टेबल असे २००० नग खरेदी केली.

मार्च महिन्यात लाॅकडाऊन जाहीर झाले, तेव्हापासून आजपर्यंत शाळा बंद आहे. शाळा कधी सुरू करायच्या या बाबतीत शासन निर्णय होणे बाकी असताना, अशा परिस्थितीत जुनमध्ये ही खरेदी केली व बालवर्गामध्ये साहित्य वाटत झाले नसताना सुद्धा, संबंधित ठेकेदाराचे बिल अदा केले आहे. याबाबत विचारणा केली असता, संबंधित साहित्य नेहरूनगर येथील गोदामात आहे, असे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात गोदामाची पाहणी केली असता त्या ठिकाणी कुठलेच साहित्य आढळून आले नाही. या बाबत विचारणा केली असता, संबंधित गोदामातील कर्मचारी यांनी बिषयाला बगल दिली.

ना ठेकेदाराने टेबल खुर्च्या वाटप केल्या ना प्रशासनाने. मग शाळा बंद असताना साहित्य गेले कोणीकडे? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने, संबंधित शिक्षण विभाग व भांडार विभागाच्या वतीने खरेदी केलेल्या या खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्यात येऊन, सत्यपरिस्थिती जनतेसमोर आणावी आणि संबंधीत खरेदीत गैरव्यवहार झाला असल्यास, संबंधित ठेकेदार व शासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी साद सोशल फाऊंडेशनचे संघटक राहुल रूपराव कोल्हटकर यांनी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे.

Exit mobile version