Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सरकारने “महिला शिक्षक दिनाच्या” निर्णयाप्रमाणेच क्रांतीकारी फुले दांपत्यांनी पुणे येथे सुरू केलेल्या पहिल्या शाळेच्या वास्तूचे “भिडे वाडा” याचे राष्ट्रीय स्मारक करावे : पि.के.महाजन

भोसरी : महाविकास आघाडी सरकारने ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुलें यांचे कार्य लक्षात घेवून, 3 जानेवारी हा सावित्रीमाई फुलेंचा जन्म दिवस “महिला शिक्षक दिन” म्हणून जाहीर केला आहे. 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीमाई फुलें यांनी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. शिक्षणामुळे माणसाची प्रगती झाली. मात्र, ज्या वास्तुतून शिक्षणाची सुरुवात झाली, तिची भयंकर दुर्दशा झाली आहे. पहिल्या शाळेच्या वास्तुची (पुणे येथील भिडे वाड्याची) दुर्दशा पाहीली तर (चारही बाजूंनी पडलेल्या भिंती, पडलेले छप्पर, इत्यादी) तळपायाची आग मस्तकात जाते.

सदर मरनावस्थेत असलेल्या वास्तुची सत्ताधारी तसेच सामाजिक संघटनांना याची खंत वाटत नाही. तसेच समोरच श्रीमंत दगडू हलवाई गणपतीचे जागृत देवस्थान आहे. देशातील लाखो लोक त्या ठिकाणी दर्शनाला येत असतात. यामध्ये राजकारणी व मोठ मोठे करोडपती, अब्जपतीही येत असतील. परंतु, एकाचेही तिकडे लक्ष जात नसेल का?

सर्व पक्षाचे नेते मंडळी असे आहे की, थोर क्रांतिकारकांच्या नावाचा वापर फक्त निवडणूकी पुरता करतात, मोठमोठी भाषणं ठोकतात, पाठांतर करून थोर क्रांतिकारकांच्या कार्याचा गौरव करतात, गुणगान गातात, एकदाची निवडणुक संपली की, सर्व “निर्लज्जंम सदा सुखी”. ‘तो मी नव्हेच’ असा आव आणून मजेत जगतात. एकालाही शरम वाटत नाही की, ज्या शाळेमुळे आपले पूर्वज शिकले, नंतर आपण शिकलो, सवरलो मोठे झालो. ज्या वास्तुमुळे आपल्या ज्ञानात भर पडली, ज्यामुळे आपल्याला खरे आणि खोटे यांच्यातील फरक कळायला सुरुवात झाली. जीवनाचा सुखी मार्ग सापडला. त्या वास्तुंच्या उपकाराची परत फेड म्हणून का होईना, येणाऱ्या पुढील पिढीपुढे आदर्श निर्माण होईल, म्हणून का होईना त्या वास्तुचे (भिडे वाड्याचे) “राष्ट्रीय स्मारक” करावे.

जनतेतील एक वर्ग असा आहे की, ज्याला कळकळीने वाटते की, सदर वास्तुचे पुनर्जीवन करून राष्ट्रीय स्मारक व्हावे. ते दरवर्षी मोर्चा काढतात, ओरडून ओरडून मागणी करतात की सरकारने त्या वास्तुचे राष्ट्रीय स्मारक करावे. परंतु, मायबाप सरकारला त्याचे काहीच देणे घेणे नाही.

महिला शिक्षक दिनाच्या निर्णयाप्रमाणेच, पहील्या शाळेच्या वास्तुचे पुनर्जीवन करून “राष्ट्रीय स्मारक” घोषित करण्याचा निर्णय सरकार लवकरच घेईल अशी अपेक्षा बाळगू या. असे विचार सामाजिक कार्यकर्ते पि.के.महाजन यांनी तमाम जनतेच्यावतीने मांडले.

Exit mobile version