नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी लिथुआनियातल्या भारतीय समुदायाला मार्गदर्शन केलं. उभय देशातले आर्थिक आणि सांस्कृतिक ऋणानुबंध अधिक मजबूत बनवण्यासाठी लुथिआनात वास्तव्य करत असलेल्या भारतीयांनी सेतू बनावे, असं आवाहन नायडू यांनी यावेळी केलं.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बाल्टिक क्षेत्रातल्या तीन देशांचा दौरा सध्या करीत आहेत. यामध्ये दुस-या दिवशी त्यांनी विल्निअस इथं नायडू यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला. लुथिआनिया आणि भारत यांच्या दरम्यान व्यापार वृद्धीच्या असंख्य संधी आहेत, मात्र सध्या या संधीचा पुरेशा प्रमाणात वापर केला जात नाही, हे लक्षात घेवून उभय देशांनी व्यापारातील अमर्याद संधी घेवून आर्थिक संबंध अधिक दृढ केले पाहिजेत. लुथिआनिया तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा महत्वाचा भागिदार बनू शकतो. नवीकरणीय ऊर्जा, कृषी-अन्न प्रक्रिया आणि जैव विज्ञान या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये भागिदारी वाढवण्याच्या संधी असल्याचे नायडू यांनी सांगितले.
जगभरातल्या अर्थव्यवस्थांचा विचार केला तर भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारत सरकारने नवीन धोरणानुसार जी पावले उचलली आहेत, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. नवीन भारताचा मंत्र ‘रिफॅार्म, परफॅार्म आणि ट्रान्सफॅार्म’ असा आहे, असंही नायडू यांनी यावेळी सांगितलं.
जागतिक बँकेच्या ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’च्या निर्देशांकानुसार 190 देशांमध्ये भारत 77 व्या स्थानावर आहे. भारताची अर्थव्यवस्था मुक्त असल्यामुळे इथं गुंतवणूक करणं सर्वार्थानं लाभदायक असल्याचंही नायडू यांनी सांगितलं.
भारत सरकारनं सुरू केलेले ‘मेक इन इंडिया’ अभियान उत्पादकांना आणि गुंतवणुकदारांना उपयुक्त ठरत आहे. तसेच ‘स्मार्ट सिटीज’, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘कुशल भारत’ सारखे अभियान यशस्वी ठरत आहे. यामुळे फक्त आमच्या देशात परिवर्तन घडून येत आहे असं नाही, तर आम्ही इतरांनी बरोबर घेवून जाण्यासाठी संधी निर्माण करीत आहोत. यामधूनच नवव्यावसायिक तयार होत आहेत. त्यांच्यासाठी ‘स्टार्ट अप इंडिया’ सारख्या योजना लाभदायक ठरत आहेत, असं नायडू यांनी यावेळी सांगितलं.
भारतामध्ये अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देताना, भविष्याचा विचार प्राधान्यानं केला जात आहे. आगामी कालखंडामध्ये देशातली 100 शहरे ‘स्मार्ट’ बनवण्यात येत आहेत. त्याचबरोबर 10 हरित विमानतळं, 7 अतिवेगवान रेल्वे गाड्या, पाच मोठी आणि महत्वाची बंदरे, महामार्ग, संपूर्ण देशभरामध्ये ब्रॅाडबँड संपर्क व्यवस्था, तसेच आमची गावे आणि नगरेही यामुळे जोडली जात आहेत, असं नायडू यांनी सांगितलं.
भारत ‘वसुधैव कुटुंबकम’ संस्कृतीचं पालन करते. त्यामुळे भारताच्या दृष्टीने संपूर्ण विश्वच एक परिवार आहे. या आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी, या विश्वामध्ये शांती नांदण्यासाठी भारत विशेष प्रयत्न करीत आहे. जगाच्या कल्याणासाठी भारत करत असल्याच्या कामाचा संदेश, भारतीय मूल्यांचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला जावा, असे आवाहन नायडू यांनी यावेळी केले.
भारतीय संस्कृती, तत्वाज्ञान, कला आणि अध्यात्म यामध्ये लुथिआनियामध्ये जो रस दाखवला जात आहे, त्याबद्दल उपराष्ट्रपतींनी कौतुक केलं.
तंत्रज्ञान क्षेत्रातही भारत अग्रेसर असून ‘चांद्रयान-2’ चं आपल्या देशानं यशस्वी प्रक्षेपण केल्याचा उल्लेख केला. हे यान संपूर्ण भारतीय बनावटीचं आहे. गेल्याच महिन्यात ही मोहीम पार पाडून भारतानं आपल्या अंतराळ क्रार्यक्रमात मानाचं स्थान मिळवलं आहे. गेल्या काही वर्षात भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कमालीची प्रगती केल्याचंही नायडू यांनी भाषणात नमूद केलं.
विल्नियस विद्यापीठानं आपल्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय मूर्तीशास्त्र, तसेच हिंदी यांचा समावेश केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली. यामुळं भारतीय तत्वज्ञान, चित्रपट आणि खाद्यपदार्थ यांची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होण्यास मदत मिळेल.
अलिकडच्या वर्षात भारतीय विद्यार्थ्यांचाही लुथिआनिया विद्यापीठांमध्ये शिकायला येण्याकडे कल वाढत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. इथं आलेल्या तरूण विद्यार्थ्यांनी इथली संस्कृती आणि इतर संवेदनशील बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं, असं आवाहनही नायडू यांनी यावेळी केलं.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती कार्यक्रमाचा उपराष्ट्रपतींनी आवर्जुन उल्लेख केला. महात्मा गांधीजींचे अतिशय निकटवर्ती मानले जाणारे स्नेही हेरमन्न काल्लेनबच हे लिथुआनियाचे होते, असंही नायडू यांनी सांगितले.
महात्मा गांधी आणि काल्लेनबच यांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून रूनसे इथं तयार करण्यात आलेल्या शिल्पाबद्दल नायडू यांनी लिथुआनिया सरकारचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमाच्या आधी नायडू यांनी कउंन्स शहराला भेट दिली आणि तिथले महापौर विसव्लदास माटिजोसैटिस यांची भेट घेतली. यावेळी भारतीय शिष्टमंडळासाठी महापौरांनी प्रीतिभोजनाचे आयोजन केले होते.
उभय देशांमध्ये व्यावसायिक संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी व्यापारिक शिष्टमंडळासह कउंन्स महापौरांनी भारतभेटीवर यावे, असं निमंत्रण उपराष्ट्रपती नायडू यांनी यावेळी दिलं.
या दौ-यात उपराष्ट्रपतींनी तंत्रज्ञान संस्थेच्या मटेरिअल सायन्स, अल्ट्रा साउंड रिसर्च संस्था तसंच जल विद्युत प्रकल्पांना भेट दिली.
लिथुआनियाचे माजी राष्ट्रपती वियटाउटस लँडस्बर्जिस यांची ही भेट घेतली आणि उभय देशातील संबंध दृढ करण्यासंबंधी चर्चा केली.