मुंबई : भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र, मुंबईच्या प्रशिक्षण केंद्राच्या 13 व्या तुकडीच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी दि. 16 ऑगस्ट 2019 रोजी मल्टीपर्पज हॉल, टीएसएच बिल्डींग, अणुशक्ती नगर मुंबई येथे सुवर्ण महोत्सव साजरा केला. या 13 व्या तुकडीने देशभरात विविध संशोधनात्मक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत महत्वाची भूमिका निभावली आहे.
भारत सरकारचे प्रधान संशोधन सल्लागार तसेच अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणु ऊर्जा विभागाचे सचिव डॉ. आर. चिदंबरम् तसेच डी.आर.एन.एस.चे अध्यक्ष डॉ. श्रीकुमार बॅनर्जी, एच.बी.एन.आय. आणि अणु ऊर्जा आयोगाचे पूर्वाध्यक्ष यांनी यावेळी उपस्थित शास्त्रज्ञांना संबोधित केले. डॉ. चिदंबरम् यांनी नॉलेज नेटवर्किंगचे महत्व, पुनरुज्जीवन आणि उत्कृष्टता यांची भूमिका, बार्कने अंमलबजावणी केलेल्या आणि इतर संस्थांनी उचललेल्या प्रशिक्षण आणि निवड पद्धतीचे फायदे यावेळी चिदंबरम् यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, हे सर्व महत्वाचे दृष्टीकोन राष्ट्राला स्वावलंबी बनवण्यासाठी उपयोगी आहेत.
डॉ. श्रीकुमार बॅनर्जी यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणाऱ्या परिणामकारक, दर्जेदार प्रशिक्षणाच्या महत्वावर जोर दिला. डॉ. चंद्रचूड यांनी वरिष्ठ शास्त्रज्ञांचे स्वागत करून त्यांनी राष्ट्र विकासामध्ये दिलेल्या योगदानाचे महत्व विशद केले. तसेच त्यांनी ‘रामायणाम्’ आणि डॉ. होमी भाभाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ऐतिहासिक प्रयत्नांसाठी ‘भाभायणाम्’ यांच्यात तुलना केली. ते पुढे म्हणाले की, भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी डॉ. भाभा यांनी खूप महत्त्वाचा मार्ग अवलंबिला.
ए.के.सिंघल यांनी उत्पत्तीचे महत्व आणि या एकत्रीकरणाचे महत्वही विशद केले.