Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विधि विद्यापीठांची दृष्टी व संकल्पना समाजहितामध्ये समाविष्ट असावी – भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे प्रतिपादन

नागपूर : कायदा व समाज एकमेकांशी निगडीत असतात. विधी विद्यापीठांची दृष्टी व संकल्पना ही समाजहीतामध्ये समाविष्ट असावी, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नागपूरात केले. वारंगा येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठ (नॅशनल लॉ युनविर्सिटी – एन. एल. यू.) कॅम्पसचे भूमीपूजन आज त्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. बोबडे तर विशेष अतिथीच्या स्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार उपास्थित होते.

कायद्याच्या शिक्षणामागील मूळ उद्देश्य समजावून घेवून विधी विद्यापीठांनी आपले कार्य वेगळया धाटणीने व सक्षमपणे करावे. विधी क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे व समाजहीतामध्ये आपले योगदान दिले पाहिजे, असे मत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी व्यक्त केले.

 

एन. एल. यू. ची स्थापना नागपूरात होणे ही नागपूरकरांसाठी अभिमानास्पद बाब असून हे विद्यापीठ केवळ राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही नाव उंचावेल. या विद्यापीठाच्या कॅम्पसचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी व ‘स्टेट ऑफ द आर्ट’ कॅम्पस निर्माण करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी सांगितले.

राजस्व कायदे, दंड सहिता यासंदर्भातील कामकाज हाताळणा-या अधिका-यांना त्यांचे अधिकार कायद्याच्या चौकटीत राहून राबवता यावेत यासाठी राज्य अधिका-यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन एन. एल. यू. मध्ये केली जातील, रामटेक मघील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या समन्वयाने एन. एल. यू. मध्ये प्राचीन न्याय शास्त्राचा अध्ययनासाठी ‘न्यायशास्त्र’ अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्षस्थानी बोलतांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व विद्यापीठाचे कुलपती एस. बोबडे यांनी दिली.वारंगा येथील एन. एल. यू. चा कॅम्पस हा ‘ग़्रीन कॅम्पस’ म्हणून विकसित करण्यावर आपला भर राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर येथे विधी अभ्यासक्रमाचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध असून राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणा-या ‘क्लॅट’  या प्रवेश परिक्षेमार्फेत प्रवेश प्रकीया होत असते वर्धा रोड स्थित येथे 60 एकरवरील कॅम्पसमध्ये अ‍ॅकेडेमीक  ब्लॉक, प्रशासकीय भवन, वसतीगृह यांचा समावेश असणार आहे.

भूमीपूजन समारंभास एन. एल. यू. चे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपास्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार यांनी केले.

Exit mobile version