Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे “उंदराला मांजर साक्ष” ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भांडार विभागाकडून निरनिराळ्या योजना आखून, त्या माध्यमातून करोडो रूपयांची करण्यात येणारी उधळपट्टी चुकीची आहे. शहरातील करदात्या नागरीकांच्या कररूपी पैश्यांचा शहर विकासासाठी योग्य रितीने वापर व्हावा, हि सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. कोणाच्या तरी आर्थिक हितासाठी घेण्यात येणारे निर्णय म्हणजे महापालिकेचा “भांडार विभाग” हा भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालल्याचे दिसून येत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केला आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री व महापालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, संपूर्ण जग कोरोना संकटाशी झुंजत आहे. आपत्कालीन ओढवलेल्या या परिस्थितीमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे भांडार विभागाने सगळे काही ठप्प असताना, तसेच शाळा कॉलेजेस बंद असताना देखील, खरेदीचा सपाटा लावला आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने बालवर्गासाठी टेबल-खुर्च्या यांची मागणी ही १४ फेब्रुवारी २०१९ साली भांडार विभागाकडे केली होती, शिक्षण विभागाच्या मागणी नुसार भांडार विभागाच्या वतीने जून २०२० मध्ये ही खरेदी करण्यात आली. या खरेदीच्या दोन महिन्यापूर्वी म्हणजेच मार्च महिन्यात कोरोना संदर्भात लॉकडाऊन् करण्यात आला होता, सदर खरेदी ही तातडीने थांबविता आली असती व महापालिकेचा पैसा वाचविता आला असता. परंतू, तशी कोणतीही हालचाल शिक्षण विभाग व भांडार विभागाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे “उंदराला मांजर साक्ष” असाच आहे. यात भांडार विभागसहित शिक्षण विभागातील अधिकारी ही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही खरेदी खरेच बालवर्गासाठी होती की ठेकेदार/अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी होती? असा सवाल उपस्थित होत आहे. सदरील प्रक्रीया संशयास्पद असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे महापालिकेच्या तिजोरीला थोडं थोडकं नाही तर, तब्बल १ कोटी ८७ लाख रूपयांचे नुकसान झालेय. त्यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

Exit mobile version