प्रजासत्ताक दिन सोहळा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा
Ekach Dheya
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : भारतीय प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ 26 जानेवारी 2021 रोजी पोलीस मुख्यालय मैदान येथे सकाळी 9. 15 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळयाबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहेत, त्यानुसार ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ होणार आहे. कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम नियमांचे पालन करून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे म्हणाल्या, प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम सकाळी 9. 15 वाजता होणार आहे. कुठल्याही कार्यालयाला ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल त्यांनी सकाळी 8.30 पूर्वी किंवा 10 वाजे नंतर करावा, असे शासनाचे निर्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.