नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेला आज पाच वर्ष पूर्ण होत आहे. पिकासंदर्भातली शेतकऱ्यांची जोखीम कमी करण्याच्या दृष्टीकोनानं १३ जानेवारी २०१६ रोजी या योजनेला मंजूरी मिळाली होती. या योजनेची पाच वर्ष पूर्ण होत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व लाभधारक शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही योजना अधिकाधिक व्यापक करुन जोखीम कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनांचा चांगला लाभ होत आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यातल्या ३८ हजार ६५१ शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून सहभाग घेतला. या योजनेद्वारे भात, ज्वारी, भुईमूग, नाचनी, बाजरी, सोयाबिन, कांदा अशा खरीप पिकांना संरक्षण देण्यात आलं आहे. याआधी लॉकडाऊनमुळे या योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम झाला होता.
धुळे जिल्ह्यात कृषी विभागानं विशेष जनजागृती मोहीम राबवून शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न केले. २०१८ मधे ३० हजार आणि २०१९ मधे ७० हजार शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाली. २०२० च्या खरीप हंगामासाठी ६० हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
वाशिम जिल्ह्यात २०२०-२१ च्या खरीप हंगामात २ लाख ७१ हजार ७०१ शेतकऱ्यांनी, १ लाख ९२ हजार शेती क्षेत्राचा, ८०९ कोटी १५ लाख ९६५ शेतकऱ्यांचा विमा काढला आहे. खरीपातल्या नुकसानीपोटी २० हजार ९८९ शेतकऱ्यांना ११ कोटी ७२ लाख ४८ हजार रुपये मिळणार असून आतापर्यंत २ लाख ४६४ शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना गेल्या ४ वर्षांपासून लाभ मिळत असून या योजनेमुळे नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यात २०१९-२० या आर्थिक वर्षात ४ लाख ९२ हजार ४२३ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ३० हजार १६४ कोटी ५६ लाख इतकी रक्कम मिळाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेनं ही विमा रक्कम कितीतरी पटीनं अधिक असल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शिवाजी जगताप यांनी संगितलं.
परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रभावीपणे राबवण्यात आली. जिल्ह्यातल्या ८ लाख ९ हजार १७५ शेतकऱ्यांनी सोयाबिन, तुर, मुग उडीद, कापुस आदी पिकाचा विमा काढला होता. या शेतकऱ्यांना पिक विमा पोटी २९८ कोटी ३३ लाख रुपये मिळाले आहेत.