Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पूरग्रस्त भागातील पिकांचे १०० टक्के पंचनामे करणार; शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊन पुन्हा सक्षम करणार – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

सातारा : सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे 100 टक्के पंचनामे करण्यात येणार असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊन त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे करणार आहोत, असे प्रतिपादन कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी केले.

कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी कराड तालुक्यातील मालखेड येथे बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसिलदार अमरदीप वाकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूरपरिस्थिती व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे 100 टक्के पंचनामे करण्यात येणार आहेत. शासन संवेदनशील असून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देऊन पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करणार आहे.

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे पंप, ठिबक संच तसेच ट्रॅक्टर यांचेही नुकसान झाले आहे. याचेही पंचनामे करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आलेले आहे. पुरामुळे विद्युत खांब,मीटर यांचेही नुकसान झाले आहे. त्याची दुरुस्ती विद्युत वितरण कंपनीकडून दुरुस्ती करण्यात येणार आहे. जनावरांचे तसेच गोठ्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल असे आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिले.

Exit mobile version