नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात बहुप्रतिक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण उद्यापासून सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्धाटन केलं जाणार आहे. कोरोनायोद्धयांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे.
त्यापैकी काही जणांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरचित्रसंवादाद्वारे संवादही साधणार आहेत. लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कोविन ऍपचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. राज्यात पहिल्या टप्प्यात २८५ ठिकाणी लस दिली जाणार आहे.
देशातील २ हजार ९३४ लसीकरण केंद्रांपैकी ठराविक केंद्रातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. राज्यात २७९ ठिकाणी कोवीशिल्ड तर ६ ठिकाणी कोवॅक्सीन लस दिली जाणार आहे. त्यासाठी या केंद्रावरील अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानाविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.
देशात उद्यापासून सुरु होणारी ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रपतींच्या कार्यालयाशी सल्लामसलत करून पोलिओ लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून पोलिओ लसीकरण ३१ जानेवारीला असेल, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.