भारतातल्या ४४ टक्के स्टार्टअप उद्योगांच्या संचालक महिला आहेत, देशासाठी अभिमानास्पद गोष्ट – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
Ekach Dheya
नवी दिल्ली : भारतातल्या ४४ टक्के स्टार्टअप उद्योगांच्या संचालक महिला आहेत, आणि ही देशासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय संमेलनाला ऑनलाईन माध्यमातून संबोधित करत होते. सध्या डिजिटल क्रांतीचे युग आहे. स्टार्ट अप सुरु करणाऱ्या युवकांना आता चांगलं प्रोत्साहन मिळत असून, भविष्यातल्या तंत्रज्ञानासंदर्भात अनेक शोध आता समोर येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी विविध बारा प्रकारात विजेते ठरलेल्या स्टार्टअप उद्योजकांचं कौतुकही केलं. या सगळ्यांनी आपल्यातला विश्वास कायम ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं. एकत्रितपणे आणि एकमेकांसाठी काम करणं हाच आपला उद्देश असल्याचं ते म्हणाले. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात, सर्वत्र व्यवहार बंद होते, मात्र याच काळात अनेक स्टार्टही सुरु झाले. त्यामुळे आज देशभरातल्या प्रत्येक राज्यातले असंख्य जिल्हे स्टार्ट अप चळवळीशी जोडले गेले असल्याचं ते म्हणाले.