मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल संमिश्र लागले आहेत. राज्यातले प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांनी आपापल्या क्षेत्रांवर पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे. काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांच्या पॅनलनी विजय मिळवला, तर काही ठिकाणी प्रस्थापितांना राजकीय विश्रांती घेण्यास गावकऱ्यांनी भाग पाडले.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका या राजकीय पक्षाच्या अधिकृत चिन्हावर होत नसल्यामुळे, सर्वच राजकीय पक्षाचे नेते निवडून आलेल्या उमेदवारांना ‘आपले’ म्हणत आहेत. त्यामुळे सरपंच निवडणुकीनंतरच ग्रामपंचायत निवडणुकीतले पक्षीय बलाबल स्पष्ट होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत मराठवाड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, एमआयएम तसंच वंचित बहुजन आघाडीने लक्षवेधी कामगिरी केली. उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या रोसा ग्रामपंचायतीवर, वंचित बहुजन आघाडीने विजय मिळवला.
लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत, आम आदमी पार्टीचं निर्मल परिवर्तन पॅनल निवडून आलं. एमआयएम पक्षानं औरंगाबाद तालुक्यातील नायगाव भिकापूर तसंच रावरसपुरा ग्रामपंचायतीत सर्वाधिक जागा जिंकल्या तर गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ ग्रामपंचायतीत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत १० सदस्य विजयी झाले.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या पैठण ग्रामपंचायतीवर पाणी फाऊंडेशनच्या तरुण कार्यकर्त्यांचं पॅनेल विजयी झालं. औरंगाबाद जिल्ह्यात निवडणूक झालेल्या ५७९ ग्रामपंचायतींपैकी २०८ ग्रामपंचायतींवर, भाजपनं विजयाचा दावा केला आहे. तर ३६० ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात असल्याचं, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केलं आहे. रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीवर, आमदार प्रशांत बंब गटानं वर्चस्व राखलं.
आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात माजी सरपंच भास्करराव पेरे यांच्या मुलीचा पराभव झाला. फुलंब्री तालुक्यातल्या किनगाव ग्रामपंचायतीत भाजपच्या अनुराधा चव्हाण यांच्या पॅनलनं, पिसादेवी ग्रामपंचायतीत काँग्रेसचे माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांच्या पॅनलनं, तर पैठण तालुक्यातील पाचोड ग्रामपंचायतीवर रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांचं पॅनलने विजय मिळवला. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी झुकत माप दिलं, तर काही ग्रामपंचायतीत भाजप स्थानिक नेत्यांनी केलेल्या आघाडीला यश मिळालं.
जिल्ह्याच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजप शिवसेना यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी अटीतटीची लढत झाल्याचं दिसत आहे. बीड तालुक्यात निवडणूक झालेल्या २९ ग्रामपंचायतींपैकी शिवसेनेनं २१ तर राष्ट्रवादी काँग्रेसनं १५ जागांवर विजयाचा दावा केला आहे.
पाटोदा तालुक्यात ९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, त्यापैकी तीन ग्रामपंचायतींवर आमदार सुरेश धस यांच्या पॅनलने विजय मिळवला. जिल्ह्यात निवडणूक झालेल्या १११ ग्रामपंचायतींच्या एक हजार ५१ सदस्य पदांपैकी महिलांनी ५७२ जागांवर विजय मिळवला आहे.
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या ९१ ग्रामपंचायतींपैकी, ६६ ग्रामपंचायतींवर भाजपा पुरस्कृत पॅनलचा विजय झाल्याचा दावा, भाजपानं केला आहे. जालना तालुक्यातल्या ८१ पैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर, शिवसेना पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजय झाले.
घनसावंगी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर अंबड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचं वर्चस्व राहिलं. जाफराबाद तालुक्यातल्या १४ ग्रामपंचायतींवर भाजपा, तर एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.
मंठा आणि परतूर तालुक्यात बहुतांश ठिकाणी शिवसेना आणि भाजपा पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी झाले. दरम्यान, भोकरदन इथं मतमोजणी सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्यानं पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
लातूर जिल्ह्याच्या ग्रामपंचायत निकालात पालकमंत्री अमित देशमुख यांनी सत्तर टक्के विजयाचा दावा केला आहे. कॉंग्रेस पक्षाला मानणारे कार्यकर्ते विजयी झाल्याचं, देशमुख यांनी म्हटलं आहे. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी जिल्ह्यात १८७ ग्रामपंचायतीवर विजयाचा दावा केला.
औसा विधानसभा मतदार संघात बहुतांशी ग्रामपंचायतीवर, आमदार अभिमन्यू पवार समर्थक विजयी झाल्याचा दावा, भाजपाचे औसा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव यांनी केला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या पॅनेलनं, औसा तालुक्यातील धानोरा गावातील पंचायतीवर ताबा मिळवला.
परभणी जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं, स्थानिक पातळीवर आकडेवारी मांडण्यात अनेकजण गर्क झाल्याचं पहायला मिळत आहे. जिंतूर तालुक्यात बोर्डीकर गटानं १०१ पैकी ७४ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला. सेलू तालुक्यातील सर्वात मोठ्या वालूर या ग्रामपंचायतीवर, संजय साडेगावकर यांच्या पॅनलने, निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं.
बोरी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या पॅनलने, तर झरी ग्रामपंचायतीत, शिवसेनेचे नेते गजानन देशमुख आणि डॉ.प्रमोद देशमुख यांच्या नेतृत्वात, जनसेवा पॅनलने विजय मिळवला.
गंगाखेड तालुक्यात राणी सावरगांव, इसाद, मरडसगांव, धारासुर, धनगर मोहा, वागदरी या अटीतटीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत, मतदारांनी भाजपाला सर्वाधिक कौल दिला असून, तरुणांना अधिक संधी दिली असल्याचं दिसून आलं.
हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. हिंगोली नजिक बळसोंड ग्रामपंचायतीत भाजपप्रणीत पॅनलचा विजय झाला, तर नर्सी नामदेव इथं काँग्रेसप्रणीत पॅनलने विजय मिळवला. आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीत १७ पैकी १३ जागा जिंकत काँग्रेसनं वर्चस्व सिद्ध केलं, नांदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पॅनेलनं विजय मिळवला.
आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात शिवसेनेने १३५ ग्रामपंचायतींवर विजयाचा दावा केला आहे. वसमत तालुक्यात चार ग्रामपंचायतींमध्ये तर हिंगोली तालुक्यात तीन ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी एका प्रभागात उमेदवारांना समसमान मतं मिळाल्याने, ईश्वर चिठ्ठी काढून निकाल लावण्यात आला.
नांदेड जिल्ह्यात नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना मतदारांनी समसमान संधी दिली आहे. जिल्ह्यात अनेक सत्ताधारी सरपंचांनी विजय प्राप्त केले. बहुतांशी नेत्यांचे समर्थक आपापल्या भागात विजयी झाले. जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या भोकर तालुक्यातल्या बारड ग्रामपंचायतीत, शिवसेनेचे नेते बाबासाहेब देशमुख बारडकर यांनी १७ पैकी १६ जागा जिंकत, आपली सत्ता कायम राखली. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक चिखली आणि हळदा ग्रामपंचायतीत सत्ता कायम ठेऊन आहेत.
भाजपचे आमदार राजेश पवार यांचे समर्थक पॅनल मात्र आपल्याच आलू वडगाव मध्ये पराभूत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात या निवडणुकीत महाविकास आघाडीसह भाजपालाही ग्रामीण भागात अस्तित्व वाढवण्यात यश आलं आहे.
शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी ग्रामपंचायतीत तर कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या देव धानोरा इथं शिवसेनेने विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या पळसप गावात, महाविकास आघाडीला विजय मिळाला, माजी आमदार मधुकर चव्हाण यांच्या अणदूर इथं काँग्रेसनं विजय मिळवला.
भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या परंडा तालुक्यातल्या दत्तक लोणी गावात, महाविकास आघाडीच्या पॅनलचा विजय झाला, जिल्ह्यातल्या १४० ग्रामपंचायतींवर, भाजपप्रणीत पॅनेलने विजय मिळवल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिली.