देशात रोजगाराचे प्रमाण वाढत असल्याचा भविष्य निर्वाह निधी संघटनेचा निष्कर्ष
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या नोव्हेंबरमध्ये सुमारे १० लाख ११ हजार लोकांना नोकऱ्या मिळाल्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने काल जाहीर केलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याद्वारे रोजगाराचे प्रमाण देशात वाढत असल्याचे अधोरेखित होत आहे.
कोविड-१९ च्या आपत्ती काळातही एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत सुमारे ४५ लाख २९ हजार लोकांना नोकरी मिळाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ज्या इच्छुक उमेदवारांना नोंदणी केल्यानंतर महिन्याभरात नोकरी मिळाली आणि भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या योजनांचा लाभ मिळाला, अशाच उमेदवारांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
या काळात नोकरी मिळालेले बहुतांश उमेदवार २२ ते २५ वर्ष वयोगटातील आहेत. या वयोगटातील सुमारे २ लाख ७२ हजार तरुणांना या काळात नोकरी मिळाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
१८ ते २१ वयोगटातील २ लाख २१ हजार युवकांना या काळात नोकऱ्या मिळाल्या असून १८ ते २५ वर्ष वयोगटातील युवकांना पहिल्यांदाच नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यांनी भविष्य निर्वाह योजनांमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे.