कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्कार केंद्र व्हावे – मुख्यमंत्री
Ekach Dheya
पुणे- तुरुंगात असणारे हे कैदी एक मोठे मनुष्यबळ आहे. काहींच्या आयुष्याची गाडी भरकटते आणि ते येथे येतात. यातील काहींची गाडी रुळावर कशी आणता येईल यासाठी तसेच दिशा भरकटलेली माणसे, योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. येरवडा कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्कार केंद्र व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राज्यात ‘कारागृह पर्यटन’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. या पर्यटनाचा शुभारंभ आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर पुण्यातील १५० वर्षे जुन्या येरवडा कारागृहातून करण्यात आला. त्यावेळी दृकश्राव्यप्रणालीद्वारे ते बोलत होते. पुण्यातून उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार सुनील टिंगरे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई उपस्थित होते. गोंदिया येथून गृहमंत्री अनिल देशमुख हे दृरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आपल्याकडे पूर्वी जेल भरो आंदोलन असायचे. लोक आंदोलनाला तयारीने यायचे. पोलीस त्यांना अटक करायचे. मग नंतर सोडून द्यायचे. पण आता ‘जेल यात्रा’ हा नवीन प्रकार येईल. त्याला मी ‘जेल फिरो’ असे म्हणेन. आता हा नवीन प्रकार आहे, लोक महाबळेश्वरला, लोणावळ्याला जाऊन आलो, असे सांगतानाच जेलमध्ये जाऊन आलो, असे सांगतील. पण जेलमध्ये जाऊन येतो, म्हणजे गुन्हा करण्याची गरज नाही. आपण ‘जेलयात्रा’ हा पर्यटनाचा एक नवीन मार्ग दाखवला आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या येरवडा तुरुंगातील दिवसांबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. या दिवसांबाबत त्यांनी लिहिलेल्या ‘गजाआडचे दिवस’ या पुस्तकातील उताराही त्यांनी उद्धृत केला. मुख्यमंत्री म्हणाले, येरवड्यामध्ये शिवसेनाप्रमुखांना भेटण्यासाठी येत होतो. त्याकाळी ते पत्र पाठवत असत, पण शिवसेनाप्रमुखांनी पत्रात आम्हाला कधी निराश करणारी भाषा वापरली नाही. निराश होऊ दिले नाही. ‘गजाआडचे दिवस’ या पुस्तकात प्रत्येक दिवसात काय काय झाले याची तपशीलवार माहिती शिवसेनाप्रमुखांनी दिली आहे. क्रांतीकारक चाफेकर बंधू यांचा तुरुंगवास, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा आणि त्यांना भोगाव्या लागलेल्या यातनांचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. या वीर क्रांतीकारकांच्या त्यागामुळेच आपल्याला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक राष्ट्राचे ध्येय प्राप्त करता आल्याचेही त्यांनी गौरवाने नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले, या कोठड्या ज्याला आपण तुरुंग म्हणतो, त्या भिंतींमागे क्रांतीच्या ठिणग्या टाकणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना ठेवण्यात येत असे. खरे तर ही व्यक्तिमत्त्व धगधगती अग्निकुंड होती. त्यांना अशा रितीने अंधार कोठडीत टाकून, त्यांचे तेज विझून जाईल, असे इंग्रजांना वाटले असेल. पण तसे झाले नाही, त्यांचे हे तेज आणखी उजळले ते उजळलेच. त्यातून स्वातंत्र्याचा प्रकाश दिसला. त्या सगळ्यांनी त्या काळात काय काय कष्ट केले आहे, हे आपल्या लक्षात येईल. किंबहुना हे स्वातंत्र्य आपल्याला आंदण म्हणून मिळालेले नाही. त्यांनी हाल-अपेष्टा भोगल्या म्हणून हे स्वातंत्र्य मिळाले, याची जाणीव जागृत रहावी यासाठी या कोठड्या पाहाव्या लागतील, असेही ते म्हणाले. स्वातंत्र्यासाठी, आपल्यासाठी त्यांनी काय काय केले. काय भोगले याबाबत या कोठड्यांच्या भिंती बोलू लागतील. इतके सारे त्या भिंतींनी अनुभवले आहे. त्यादृष्टीने हा प्रयोग अभिनव असाच आहे. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी या अनोख्या प्रयोगाबद्दल गृहमंत्री, गृह विभाग, पोलिस बांधव, माता-भगिनींचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही ‘कारागृह पर्यटन’ या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. येरवडा कारागृहात कैद्यांची मानसिकता बदलण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न केले जातात याबद्दल गौरवोद्गार काढून त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या कारागृहातून मीनाताई ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचे वाचन केले. ते म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात कारागृहांचे विशेष महत्त्व आहे. या कारागृहात स्वातंत्र्य संग्रामातील थोर नेते महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू यांच्यासह इतर नेते बंदिस्त होते. या कारागृहांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता ‘कारागृह पर्यटन’ ही वेगळी संकल्पना आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, येरवडा तुरुंगात अनेक थोर स्वातंत्र्यसैनिक बंदी होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील महत्त्वाचा ‘पुणे करार’ येरवडा तुरुंगातील आंब्याच्या झाडाखाली झाला होता. याशिवाय स्वातंत्र्य संग्रामातील चाफेकर बंधू हे देशासाठी याच ठिकाणी शहीद झाले. जनतेला हा इतिहास समजावा, या उद्देशाने पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून कारागृह पर्यटन सुरू करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात नाशिक, ठाणे, रत्नागिरी या इतर ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कारागृहातदेखील ही संकल्पना राबविली जाईल. या कारागृह पर्यटनातून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि नागरिकांना आपल्या इतिहासातील क्षणांची अनुभूती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी कारागृहाच्या माहितीबाबत चित्रफीत दाखवण्यात आली. गांधी यार्ड, टिळक यार्ड, फाशी यार्ड आदी ठिकाणांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली.
अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांनी प्रास्ताविकातून कारागृहात राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली. कारागृह अधीक्षक यु.टी.पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, तहसीलदार तृप्ती पाटील तसेच कारागृहाचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.