राज्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी एकदिलाने लढा दिला तर सीमा प्रश्न नक्कीच सुटेल, असे मुख्यमंत्र्याचे प्रतिपादन
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी एकदिलानं आणि एकत्रितपणे लढा दिला तर सीमा प्रश्न नक्कीच सुटेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाचे आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
सीमा भागासंबंधीचा वाद सध्या न्यायालयात आहे, मात्र तरीही तिथली मराठी माणसं आणि मराठी भाषेवर कर्नाटक सरकार सातत्यानं अन्याय करत आहे. अशावेळी विवादित सीमाप्रदेशाचा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करायला हवा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सीमाभागातले नागरिक महाराष्ट्रातलेच आहेत, राज्य सरकार नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
मात्र कर्नाटकाचा अत्याचार थांबायचा असेल तर, महाराष्ट्र एकीकरण समितीनंही एकसंध राहायला हवं असे सांगतानाच, मुख्यमंत्र्यांनी, समितीमधे पडलेल्या फुटीविषयी खंतही व्यक्त केली. यापुढच्या प्रत्येक निवडणुकीत सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार पुन्हा निवडून यायला हवेत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.सीमाप्रश्नी न्यायालयात सुरु असलेला लढा, हे या लढ्याचं अंतिम पर्व आहे. तो जिंकण्यासाठी आपल्याला तयारीनिशी उतरावे लागेल असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. ही बाब गांभीर्यानं घेऊन त्यात मुख्यमंत्री विशेष लक्ष देत असल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.
लोकांनी इतकी वर्ष निकरानं आणि संयमानं दिलेला हा जगातला एकमेव लढा असेल, आणि त्याचं सारं श्रेय सीमा भागातल्या मराठी माणसांचंच आहे असे ते म्हणाले. आज प्रकाशित झालेलं पुस्तक सीमालढ्याचा इतिहास नजरेसमोर आणण्यासाठी, तसेच न्यायालयातल्या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी निश्चितच मदत करणारं ठरेल, असेही पवार यांनी नमूद केले.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद-संघर्ष आणि संकल्प हे पुस्तक सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारितल्या सीमाकक्षानं प्रकाशित केले असून, या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक पवार यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सीमाभाग समन्वयक मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे, मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई तसंच विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही या कार्यक्रमाला उपस्थित होते.