ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे एका कंपनीत लागलेल्या आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे सरवली एमआयडीसी परीसरात असलेल्या कपिल रेयॉन इंडिया या डाईंग कंपनीत काल मध्यरात्रीच्या सुमाराला आग लागली आहे. या कंपनीत कच्च्या आणि पक्क्या कपड्याचा मोठ्या प्रमाणावर साठा होता. तसेच मोठ्या प्रमाणात धागाही साठवून ठेवलेला होता.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कल्याण, ठाणे आणि एमआयडीसीच्या अग्निशामक दलाचीही मदत मागवली आहे.
कंपनीला लागलेल्या या आगीमुळे परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ पसरले असून अजूनही आग आटोक्यात आली नसल्याने त्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
आग लागली त्यावेळी या कंपनीत सुमारे ३० ते ४० कामगार होते. मात्र कामगारांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
अग्निशमन दलाला पाण्याच्या कमतरतेमुळे आग आटोक्यात आणतांना मोठी अडचण निर्माण होत आहे. आगीमुळे कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून या आगीचे नेमके कारण अजून समजलेले नाही.
दरम्यान काल संध्याकाळी ६ च्या सुमाराला डोंबिवलीत मानपाडा पोलीस ठाण्याच्या मागे गँलेक्सी या फार्मासिटिकल कंपनीत लागलेली आग आटोक्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाचे ६ बंब आणि ५ टँकर्सच्या सहाय्याने आज दुपारी एकच्या सुमाराला आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती डोंबिवली अग्निशमन केंद्राने दिली.