नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन कृषी कायद्यांविरोधात विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे, काल संसदेचे दोन्ही सदनांचे कामकाज होऊ शकले नाही. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पार्टी, शिवसेना आणि अन्य पक्षाच्या सदस्यांनी, अध्यक्षांच्या आसनाच्या समोर येऊन सरकारविरोधी घोषणा देण्यास सुरूवात केली.
अध्यक्ष ओम बिरला यांनी विरोधकांना या मुद्यावर चर्चेला वेळ मिळेल असे सांगितले, मात्र त्यानंतरही विरोधी सदस्यांची घोषणाबाजी सुरूच होती, परिणामी सदनाचे कामकाज स्थगित करण्यात आले. तत्पूर्वी राज्यसभेतही या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
विरोधकांनी सदनाच्या मध्यभागी येऊन घोषणाबाजी सुरू केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चेची मागणी केली. त्याआधी सभापती व्यंकय्या नायडू यांनी, विरोधकांना या मुद्यावर चर्चा घेण्याचं आश्वासन दिले, मात्र विरोधकांनी सभापतींना कार्य स्थगितीचा प्रस्ताव देऊन तत्काळ चर्चेची मागणी केली. दरम्यान, सभापतींनी ही मागणी फेटाळल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.