Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव तपासून तयार करण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई : अस्थायी सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याबाबत काय करता येईल याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने तपासून तयार करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

अस्थायी सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा नियमित करुन शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार अमिन पटेल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह अस्थायी सेवेतील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख म्हणाले, तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांना नियमित करण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर आवश्यक ते निकष ठरवून योग्य ती कार्यवाही होण्याबाबतचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. यामधील अनेक वैद्यकीय अधिकारी यांनी तात्पुरत्या सेवेचा दोन वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण केला आहे.

वैद्यकीय अधिकारी संवर्गातील रिक्त पदांवर विद्यार्थ्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या करण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळेचे आता या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याकरिता काय करावे लागेल, कोणत्या बाबींची पूर्तता या विद्यार्थ्यांना करणे आवश्यक राहील याबाबतचा सविस्तर प्रस्ताव विभागाने सादर करावा असे निर्देश श्री. देशमुख यांनी यावेळी विभागाला दिले.

Exit mobile version