Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लोणारच्या धारातीर्थ परिसर व दैत्यसुदन मंदिराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

????????????????????????????????????

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार येथील धारातीर्थ परिसराची पाहणी केली. धारातीर्थ येथील सतत वाहणारी धार, परिसरात असलेली वृक्षवल्ली, वन्यजीव आदींची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. माहिती घेत असतानाच परिसर विकासाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.

यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, बुलडाणा ‘कृउबास’चे सभापती जालींधर बुधवत आदींसह पुरातत्व विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरोवरासोबत सेल्फीसुद्धा घेतला. तसेच उपस्थितांसोबत सरोवराचे छायाचित्रणही केले.

धारातीर्थ परिसराच्या विकासाबाबत सूचना देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, परिसरातील जमिनीचे सपाटीकरण करून लँण्डस्केप विकसित करावे. अतिशय मानव निर्मितपणा वाटू नये याची काळजी घेत त्याचा नैसर्गिकपणा जपावा. सौंदर्यीकरण करून शोभेची झाडे लावण्यात यावीत. परिसराच्या विकासासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे.

धारातीर्थ परिसराची पाहणी करुन मुख्यमंत्र्यांनी गावातील दैत्यसुदन मंदिराला भेट दिली. दैत्यसुदन मंदीरात मुख्यमंत्र्यांनी तेथील ऐतिहासिक शिल्पाविषयी माहिती घेतली. दैत्यसुदन मंदिरातील कोरीव कामाची पाहणीही त्यांनी केली. याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसोबत छायाचित्रण केले. कोरीव कामांचे मोबाईलमध्ये छायाचित्र काढले. यावेळी लोणार सरोवराचे अभ्यासक स्व. सुधाकर बुगदाने यांच्या स्नुषा शैलेजा श्रीपाद बुगदाने व शुभदा स्वप्नील बुगदाने यांनी स्व. सुधाकर बुगदाने लिखित लोणार सरोवर हे पुस्तक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट दिले.

Exit mobile version