वीज बिलांची माफी आणि वीजजोडण्या कापण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात भाजपाचं ठिकठिकाणी टाळे ठोको आंदोलन
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : वीज बिलांची माफी आणि वीज जोडण्या कापण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात भाजपानं आज राज्यात अनेक ठिकाणी टाळे ठोको आंदोलन केलं.
उत्तर मुंबईतल्या भाजपा कार्यालयापासून ते कांदिवली इथल्या अदानी वीज कंपनीच्या कार्यालयापर्यंत भाजपानं मोर्चा काढला. यावेळी वाढीव वीज देयकांकवरून घोषणाही दिल्या गेल्या. भाजपाचे स्थानिक लोकप्रनिधी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
अहमदनगर इथं आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात राहता इथं आंदोलन झालं. यावेळी आंदोलकांनी शंभर युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी अशी मागणी केली.
नाशिकमधल्या तिबेटीयन मार्केट परिसरातल्या वीज वितरण कार्यालयासमोर भाजपानं आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी कार्यालयाचा टाळं लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलीस आणि आंदोलक कार्यकर्त्यांमधे झटापट झाल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपानं आंदोलन केलं.
लातूरमधेही भाजपाचे शहर संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं. यावेळी पोलीसांनी आंदोलकांना अटक करून नंतर सोडून दिल्याचं वृत्त आहे. हिंगोलीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कळमनुरी इथल्या महावितरणच्या कार्यालयाला कुलूप लावलं.
लातूरमधे आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी औसा इथं महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं. धुळे जिल्ह्यातल्या महावितरण कार्यालयालाही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कुलुप लावलं.