नवी दिल्ली :-सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनं (पॅकिंग आणि लेबलिंग) नियम 2008 मधे करण्यात आलेल्या सुधारणेला अनुसरुन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने तंबाखूजन्य सर्व उत्पादनांच्या वेष्टनावर देण्यासाठी विशिष्ट आरोग्य इशाऱ्याबाबतच्या अधिसूचित संचातील दुसऱ्या चित्राचा वापर लागू केला आहे. 1 सप्टेंबर 2018 पासून सुधारित नियम लागू करण्यात आले आहेत.
या संदर्भात दोन चित्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. चित्र 1 लागू झाल्यापासून 12 महिन्यानंतर चित्र 2 प्रदर्शित केले जाईल.
1 सप्टेंबर 2018 पासून चित्र-1 अंमलात आले असून 1 सप्टेंबर 2019 किंवा त्यानंतर उत्पादित, आयात किंवा पॅक केलेल्या तंबाखूजन्य उत्पादनांवर चित्र-2 दर्शवावे लागेल.
“QUIT Today Call 1800-11-2356” हा क्रमांकही या इशाऱ्याचाच एक भाग आहे. तंबाखूजन्य उत्पादनांचा वापर करणाऱ्यांमध्ये त्याच्या दुष्परिणामाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्यात वर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठीच्या सेवेपर्यंत पोहोचण्यासाठी याचा उपयोग होतो.
तंबाखू सोडण्यासाठी सेवा देणाऱ्या 1800-11-2336 या नि:शुल्क क्रमांकावर समुपदेशन आणि उपाय सुचवले जातात.
जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणाच्या नुकत्याच झालेल्या दुसऱ्या फेरीनुसार 15 आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातल्या व्यक्तींपैकी 61.9 टक्के सिगारेट ओढणाऱ्या, 53.8 टक्के विडी पिणाऱ्या व्यक्तींनी, सिगारेट, विडीवरच्या वेष्टनावरचा इशारा पाहून सिगारेट, विडी सोडण्याचा विचार केला.
ही चित्रे वापरासाठी https://mohfw.gov.in, https://ntcp.nhp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.