नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्रालयाच्या नव्या संकेतस्थळाचा प्रारंभ केला.
महामार्ग बांधकाम, भू-संपादन, फास्टॅग याविषयी माहिती देणारा डॅशबोर्ड या नव्या संकेतस्थळावर आहे. देशातल्या वाहन नोंदणीविषयी राज्यनिहाय तसेच महिन्यानुसार आकडेवारी आणि माहितीही यावर देण्यात आली आहे.
मोटार वाहन कायदा 2019 लागू करण्यासाठी आपल्या मंत्रालयाने पावले उचलल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. विधी मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यास वरील कायद्यातील दंड, परवाना, नोंदणी यांबाबतच्या 63 कलमांची अंमलबजावणी सप्टेंबरपासून सुरु होईल.
मोटार वाहन कायदा 2019 मुळे रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होऊन अपघातातल्या बळींची संख्याही कमी होईल अशी आशा गडकरी यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केलेली 786 अपघातप्रवण स्थळे सुधारण्याच्या दृष्टीने मंत्रालय 12,000 कोटी रुपये खर्च करत असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.
‘माय फास्टॅग’ ॲपच्या मदतीने तसेच 22 बँकांच्याद्वारे फास्टॅगचा वापर करुन टोल संकलन सोपे होईल.