Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात पेट्रोल-डिझेलवरचे कर कमी करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं अजूनही जीएसटी परताव्याचे २५ हजार कोटी रुपये दिलेले नाहीत. त्यामुळे राज्यापुढं आर्थिक पेच निर्माण झालाय, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ते काल नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. यंदाचा अर्थसंकल्प ७५ हजार कोटींच्या तुटीचा असण्याची शक्यता आहे. केंद्राकडून हा परतावा मिळाला नाही तर राज्याचा अर्थसंकल्प १ लाख कोटी रुपयांच्या तुटीचा असेल, असं ते म्हणाले.

आता केंद्राची स्थिती सुधारत असली, दर आठवड्याला पैसे येत असले, तरी जेवढे पैसे यायला हवेत तेवढे येत नाहीत, असं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकारचा आतापर्यंत चा बराच काळ कोरोना महामारीत गेला. त्यामुळे विकास दर घटलाय. त्यामुळे अनेक कामांना कात्री लावावी लागली. तरीही राज्यात पेट्रोलचे दर कमी करण्याचा सरकारचा मानस आहे. यासंदर्भात आघाडी सरकारमधल्या घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून येत्या अर्थसंकल्पात कर कमी करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राहिल, असं पवार यांनी सांगितलं.

केंद्रात भाजपा सरकार दुसऱ्यांदा निवडून आलं त्यावेळी पेट्रोलिय पदार्थांचे दर आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय खाली गेले होते. परंतु, देशवासियांना अपेक्षित दिलासा मिळू शकला नाही, अशी टीका त्यांनी केली. येत्या काळात पेट्रोल १०० रुपये दरानं मिळालं तर आश्चर्य वाटू नये, असं ते म्हणाले.

Exit mobile version