नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत काल २०२१-२२ या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली. कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी या चर्चेला सुरुवात करताना या अर्थसंकल्पात संरक्षण दलांसाठी पुरेशी तरतूद नसल्याचा आरोप केला.
तर या अर्थ संकल्पात ज्येष्ठ नागरिक, महिला, युवकांसह समाजातल्या सर्व घटकांसाठी भरीव तरतूद असल्याचं भारतीय जनता पार्टीच्या मीनाक्षी लेखी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना देशविरोधी म्हणणं अयोग्य असून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी सोडवाव्यात, अशी मागणी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी, केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत असल्याची टीका केली.
भाजपच्या हेमामालिनी यांनी मात्र केंद्रीय अर्थसंकल्प दूरदृष्टीचा असून यामुळे देश स्वावलंबी होण्याच्या मार्गावर वेगानं जाईल, असं प्रतिपादन केलं.तसेच राज्यसभेतही काल २०२१-२२ च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा झाली. भाजपा खासदार सुशील कुमार मोदी यांनी काल सभागृहात प्रथमच चर्चेत भाग घेतला. या अर्थसंकल्पामुळ आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीची वाट आणखी सुकर होणार असल्याचं सुशील कुमार मोदी यांनी यावेळी सांगितलं.
तत्पूर्वी काँग्रेस खासदार कपिल सिब्बल यांनी या चर्चेला सुरुवात करताना; या अर्थ संकल्पात बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत काहीही ठोस योजना नसल्याचा आरोप केला. सरकारला खासगीकरणात अधिक रस असल्याचं सिब्बल म्हणाले. उद्याही राज्यसभेत अर्थ संकल्पावर चर्चा सुरू राहणार आहे.