Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महेंद्रा अँन्थीया सोसायटीचे चौथे गेट बंद करा : भारती घाग

मजदूर महिला संघ आणि गांधीनगर मधिल रहिवाशांची मागणी

पिंपरी : पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते नेहरुनगर चौकाकडे जाणा-या रस्त्यावर महेंद्रा अँन्थीया हि शेकडो सदनिकांची सोसायटी आहे. या सोसायटीच्या गेट समोर गांधीनगर झोपडपट्टी आहे. या परिसरात रस्ता अरुंद असून सोसायटीमध्ये जाण्या – येण्यासाठी तीन गेट आहेत. सोसायटीत राहणा-या नागरीकांची लोकसंख्या मोठी आहे. या सोसायटीच्या गेटमधून पहाटे पाच पासून मध्यरात्रीपर्यंत हजारो वाहनांची ये – जा सुरु असते. त्यामुळे येथे नेहमीच वाहतुकीस अडथळा येतो. यापुर्वी येथे अनेक छोटे – मोठे अपघात झाले असून एका तरुणाचा अपघातात बळी गेला आहे तर अनेक दुचाकीस्वार जखमी झालेले आहेत. सोसायटीत येण्या – जाण्यासाठी तीन मोठे गेट असताना या सोसायटीने येथील गणेश मंदिरासमोर चौथे गेट बनविले आहे. वस्तूत: आहे त्याच तीन गेटमुळे येथे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. नेहमी अपघात होतात. पुन्हा चौथे गेट उघडल्यामुळे यात आणखी भर पडेल आणि येथिल नागरिकांना त्याचा त्रास होईल. त्यामुळे महेंद्रा अँन्थीया या सोसायटीचे चौथे गेट सुरु करण्यास महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने परवानगी देऊ नये अशी मागणी मजदूर महिला संघाच्या अध्यक्षा भारती विलास घाग आणि इतर महिलांनी केली आहे.

याबाबत त्यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच मनपाच्या बांधकाम परवानगी विभागास आणि वाहतुक पोलीस शाखा विभागास लेखी निवेदन दिले होते. या निवेदनाकडे संबंधित अधिका-यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शुक्रवारी भारती घाग यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी महिंद्रा ॲन्थीया सोसायटी समोर निदर्शने केली. या निदर्शनात बबिता ससाणे, सुनिता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, सुनिता मिसाळ, आशा साळवी, वंदना कांबळे, दिपाली बारगुळे, ताई सुर्यवंशी, जनाबाई सूर्यवंशी, बायजाबाई निसर्गंध, अर्चना सूर्यवंशी आदींनी सहभाग घेतला होता.

Exit mobile version