नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कार्यालयांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. यानुसार, प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये औषधाची दुकाने आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंदच राहणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कार्यालयांमध्ये सार्वजनिक आरोग्य सुरक्षेच्या सर्वसाधारण नियमांचे पालन केले जावे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
सर्व कर्मचारी आणि कार्यालयांना भेट देणाऱ्या नागरिकांनी या नियमांचे पूर्णपणे पालन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या नियमांमध्ये, व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर राखणे, मास्कचा वापर आणि सातत्याने हात धुणे यांचा समावेश आहे.
कार्यालयांच्या प्रवेश द्वारावरच येणाऱ्यांची आरोग्य तपासणी करून केवळ लक्षणे नसणाऱ्यांनाच प्रवेश दिला जावा, प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली जावी, बैठकांसाठी शक्यतो दूर दृश्य प्रणालीचा वापर करावा, अशा सूचनाही आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत.
कार्यालयांमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास त्या रुग्णावर डॉक्टरांमार्फत उपचार सुरू करतानाच त्याने कार्यालयात ज्या ठिकाणांना भेट दिली आहे, त्या भागांचे तातडीने निर्जंतुकीकरण करावे, असे सांगण्यात आले आहे.