गाव विकासासाठी गावकऱ्यांनी एकदिलाने काम करण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
Ekach Dheya
मुंबई : गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायत महत्त्वाची भूमिका बजावत असते. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. गावाच्या विकासासाठी मतभेद व मनभेद विसरून सामूहिक एकजूट दाखविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
नियोजन भवन येथे ठाणे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने सन २०१८-१९ चा स्मार्ट ग्राम पुरस्कार व सन २०१९-२० चा आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव या पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील एकूण १२ ग्रामपंचायतीना तालुका आणि जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, कृषि, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमाळे, समाज कल्याण समिती सभापती नंदा उघडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी सिशोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार, जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत, रेखा कंठे, श्रीमती भांडे , आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर.आर.पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री. शिंदे यांनी आबांच्या आठवणीना उजाळा देताना सांगितले की, स्व.आर.आर.पाटील यांनी ग्रामविकासामध्ये केलेले काम राज्य आणि देशासाठी मार्गदर्शक आहे. ग्राम विकासासाठी आबांनी मांडलेल्या संकल्पनावर आजही गाव विकास सुरू आहे. लोकोपयोगी व सामाजिक एकोपा जपण्याची स्वयंप्रेरणा जनमाणसात रुजवण्याचे काम आबांनी केले असेही त्यांनी यावेळी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील गावे राज्यासाठी आदर्श निर्माण करणारे व्हावेत असा सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी परस्पर समन्वयातून गावाच्या विकासासाठी नियोजन करावे. प्रत्येक गाव सुंदर व सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी शासन आणि जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.आपल्याला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्री श्री.शिंदे यांनी दिले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी ठाणे जिल्ह्यामध्ये वेळोवेळी धडाडीने राबविल्या जातात. यामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान, निर्मळ ग्राम अभियान यांचा उल्लेख करावा लागेल. आणि याचीच उद्दिष्ट साध्य म्हणायचे तर ठाणे जिल्हा परिषदेमधील सर्व ग्रामपंचायती या निर्मळ ग्राम पुरस्काराने सन्मानित झाल्याच्या त्या म्हणाल्या. उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आगामी काळात या पुरस्कारासाठी गावागावांमध्ये निकोप स्पर्धा व्हायला हवी असे सांगितले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना आर.आर. (आबा) पाटील सुंदर गांव योजची उद्दिष्ट स्पष्ट करतानाच गुणवत्तेच्या निकषांवर पुरस्कारांची निवड केल्याचे स्पष्ट केले.
पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती
शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार प्राप्त गुणांचे आधारे सन 2018 – 19 स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा तपशिल पुढील प्रमाणे
जिल्हा स्मार्ट ग्राम – ग्रामपंचायत बापसई ता. कल्याण
तालुका स्मार्ट ग्राम –
1) ग्रामपंचायत बापसई ता. कल्याण.
2) ग्रामपंचायत चिंचवली (कुंदे) ता. भिवंडी.
3) ग्रामपंचायत शिरोशी ता. मुरबाड.
4) ग्रामपंचायत ढवळे –कुडसावरे ता. अंबरनाथ.
5) ग्रामपंचायत ठुणे ता. शहापूर.
तसेच सन 2019 –20 आर.आर. (आबा) पाटील सुंदर गांव योजनेंतर्गत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा तपशिल पुढील प्रमाणे.
जिल्हा सुंदर गांव – ग्रामपंचायत चिंचवली (खांडपे) ता. भिवंडी
तालुका सुंदर गांव –
1) ग्रामपंचायत चिंचवली (खांडपे) ता. भिवंडी
2) ग्रामपंचायत काकडपाडा ता. कल्याण.
3) ग्रामपंचायत वैशाखरे ता. मुरबाड.
4) ग्रामपंचायत दळखण ता. शहापूर.
5) ग्रामपंचायत नेवाळी ता. अंबरनाथ.
वरील निवड करण्यात आलेल्या तालुक्यातील प्रथम ग्रामपंचायतीस पारितोषिकाच्या स्वरुपात रक्कम रु. 10 लक्ष आणि जिल्हयातून प्रथम ग्रामपंचायतीस पारितोषिकाच्या स्वरुपात रक्कम रु. 40 लक्ष, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सह्ययक गट विकास अधिकारी हणमंतराव दोडके यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या शिर्के यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे खातेप्रमुख, गट विकास अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उप मुख्य कार्यकारी (ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.