Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रेबीज मुक्त अभियानास राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य – मंत्री सुनिल केदार

मुंबई: प्राण्यांपासून होणाऱ्या रेबीज या आजाराला मुक्त करण्यासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थेने सुरु केलेले रेबीज मुक्त अभियान २०२५ या उपक्रमास राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असून दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

जीव – जंतू कल्याण दिन 2021 निमित्त  रेबीज (rabies) मुक्ती अभियान २०२५ चा शुभारंभ मंत्रालय परिसरात करताना ते बोलत होते. यावेळी आमदार आशिष जयस्वाल आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष अँड. दगडू लोंढे आणि सदस्य उपस्थित होते.

यावेळी सुनिल केदार यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात स्वानाचे रेबीज लसीकरण करण्यात आले. रुग्ण वाहिकेला श्री.केदार यांनी हिरवी झेंडी दाखवून अभियानास प्रारंभ केला.

श्री.केदार म्हणाले, आपल्या परिसरातील जीव जंतूवर अन्याय किंवा क्रुरता होवू नये याकरिता जीव-जंतू दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने राज्यात उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून रेबीज मुक्ती अभिमान राबविण्यात येत आहे. कुत्र्यांना लस दिल्याने मानवाला चावल्यास रेबीज होत नाही. म्हणजे एक प्रकारे मानव सेवेचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. राज्यात हे अभियान राबविणे  एका संस्थेला शक्य नाही. याकरिता राज्य शासन सर्व प्रकारचे सहकार्य करणार असून २०२५ पर्यंत राज्य रेबीज मुक्त करण्यासाठी शासनाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असेल असे सांगून संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. दगडू लोंढे यांनी सांगितले की, देशात वर्षाला ३० हजार लोकांचा मृत्यू रेबीजमुळे होतो. यासाठी संस्थेने २०२५ पर्यंत राज्य रेबीज मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी राज्य शासनाचे सहकार्य मोलाचे असणार आहे.

Exit mobile version