Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के

Ahmedabad: Health workers prepare for conducting rapid antigen testing for diagnosis of COVID-19 cases, at a locality in Ahmedabad, Friday, July 10, 2020. (PTI Photo) (PTI10-07-2020_000119B)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के झाला आहे. काल ११ हजार ८३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले, ११ हजार ६१० नवे कोरोनाबाधीत आढळले, तर १०० रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत १ कोटी ९ लाख ३७ हजार ३२० लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १ कोटी ६ लाख ४४ हजार रूग्ण कोरोनामुक्त झाले. तर १ लाख ५५ हजार ९१३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशभरात १ लाख ३६ हजार ५४९ अॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत ८९ लाख ९९ हजार २३० जणांचं कोरोनाप्रतिबंधक लसीकरण झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांची दैनंदिन संख्या वाढत आहे. कालही राज्यात कोविड १९ च्या ३ हजार ६ शे ६३ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची एकंदर  संख्या २० लाख ७१ हजार ३ शे ६ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून मुंबई आणि पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून विदर्भातल्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. काल नागपूरमध्ये  सर्वाधिक बाधितांची नोंद झाली. नागपूर महानगर पालिका क्षेत्रात काल ५०२ बाधित आढळले.

ही संख्या मुंबई महापालिकेतल्या बाधितांपेक्षाही अधिक आहे. मुंबईत काल ४०६ नवबाधितांची नोंद झाली. विभागवार विचार करता मुंबई-ठाणे, अकोला, नागपूर आणि पुणे विभागात काल मोठ्या प्रमाणावर बाधितांची नोंद झाली. मुंबई-ठाणे विभागात ८६२ पुणे विभागात ७४९ अकोला विभागात ६६२ तर नागपूर विभागात ६९९ बाधितांची काल नोंद झाली.

काल नवबाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमी होती; त्यामुळे उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या राज्यात एकंदर ३७ हजार १ शे २५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल २ हजार ७ शे रुग्ण बरे झाले; त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १९ लाख ८१ हजार ४ शे ८ झाली आहे.रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर ९५ पूर्णांक ६६ शतांश टक्के झाला आहे. काल राज्यात ३९ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्यानं राज्यातील मृत्यूदर २ पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे.

Exit mobile version