महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा मंगळवारी रहाटणीमध्ये : प्रेक्षकांशिवाय होणार कुस्ती स्पर्धा
Ekach Dheya
पिंपरी : कै. वस्ताद बाळासाहेब विठोबा गावडे प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा’ मंगळवारी (दि. 23 फेब्रुवारी) होणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते हणुमंत गावडे तसेच पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
‘कोरोना कोविड-19’ च्या पार्श्वभूमीवर शासनाने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार या स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धा या वर्षी प्रेक्षकांशिवाय होतील. या निवडचाचणी कुस्ती स्पर्धेसाठी स्पर्धक पहिलवानांनी मंगळवारी (दि. 23 फेब्रुवारी) सकाळी 9 वाजता वजन तपासणीसाठी उपस्थित रहावे. येताना आधार कार्ड व वास्तव्याचा पुरावा हि कागदपत्रे सोबत आणावी. स्पर्धा दुपारी 3 वाजता. रहाटणी येथील ‘थोपटे लॉन्स’ मध्ये होणार आहेत. स्पर्धत पहिलवानांसोबत एक पालक उपस्थित राहू शकतील. यावेळी फक्त वरिष्ठ गटातील माती व गादी विभागातील स्पर्धा होतील. कुमार गटांतील स्पर्धेविषयी नंतर माहिती देण्यात येईल. वरिष्ठ गटासाठी माती व गादी विभागातील वजन गट 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 आणि 86 ते 125 (महाराष्ट्र केसरी गट) या प्रमाणे असतील. वस्ताद, मार्गदर्शक, पालक आणि स्पर्धकांनी वेळेत उपस्थित रहावे तसेच ‘कोरोना’ विषयी सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
या स्पर्धा आयोजनात पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संतोष माचूत्रे, खजिनदार दिलीप बालवडकर, भारत केसरी विजय गावडे, उपाध्यक्ष धोंडीबा लांडगे, विशाल कलाटे, काळूराम कवितके आदींनी सहभाग घेतला आहे.