पुणे (वृत्तसंस्था) : पुण्याच्या उपनगरांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून रुग्ण आणखी वाढल्यास प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचा आणि मास्कसंदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काल सांगितल.
महापालिका आयुक्तांसह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पुणे शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या तेराशे वरुन सतराशे पर्यंत वाढली आहे.
महापालिकेची सतरा स्वॅब कलेक्शन सेंटर सध्या सुरू असून आणखी चार सेंटर सुरू करण्यात येणार आहेत, तसंच कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेकडे सध्या १ हजार १६३ खाटा उपलब्ध असून खाजगी रुग्णालयांच्या तीन हजार खाटा उपलब्ध आहेत. चिंतेचं कारण नसलं तरी पुणेकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन महापौर मोहोळ यांनी केलं.
दरम्यान पुणे जिल्ह्यात गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर आणि कार्यक्रमांवरही प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. ग्रामीण भागातल्या विवाह समारंभांमध्ये जास्त लोकांच्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे स्पष्ट निर्देश महसूल आणि पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहेत.
विविध प्रकारच्या सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांनाही पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. मास्क, शारीरिक अंतर आणि इतर नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.