Site icon साप्ताहिक एकच ध्येय

4 वर्षात खादीची उलाढाल 3215 कोटी वर पोहोचली – विनय सक्सेना

मुंबई : महात्मा गांधींची 150 वीं जयंती आणि 20 वा लॅक्मे फॅशन शो हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई आणि लॅक्मे कंपनी यांनी संयुक्तपणे आयोजित केला आहे. मुंबईतल्या सेंट रेजिस हॉटेलमधे 22 ते 25 ऑगस्ट 2019 दरम्यान आयोजित होणाऱ्या या फॅशन शोचे ‘#वेअर युवर खादी’ असे नाव आहे.

आज उद्‌घाटन समारंभ प्रसंगी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय सक्सेना म्हणाले की, खादी हा वारसा असून, त्याचे स्वरुप पर्यावरणस्नेही आहे. महात्मा गांधींनी दिलेली ही भेट असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खादी उद्योग जोमाने प्रगती करत आहे. 72 वर्षांनंतरही खादी सर्वांना प्रेरणा देण्याचे काम करत आहे.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली खादी उद्योगाने गेल्या पाच वर्षात 28 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली असून, गेल्या चार वर्षात एकूण उलाढाल 889 कोटी रुपयांवरुन 3215 कोटी रुपये इतकी वाढली आहे.

खादी आणि ग्रामोद्योग उल्लेखनीय प्रगती करत आहेत. आपल्याकडे अनेक कुशल कारागीर आणि डिझायनर्स आहेत. केंद्र सरकारचे नवे प्रोत्साहन आणि विपणन धोरण अतिशय प्रभावी आहे. गेल्या पाच वर्षात खादीचे उत्पादन 103.66 दशलक्ष चौरस मीटरवरुन 170 दशलक्ष चौरस मीटरपर्यंत वाढले आहे. जग ऑटोमेशनकडे वळत असताना खादीने आपला नैसर्गिक मानवी कलेचा वारसा जतन केला आहे. या कारागीरांना मदत करण्यासाठी जनतेने खादी उत्पादने खरेदी करण्याची गरज आहे.

खादीने 20व्या आणि 21व्या शतकाला जोडण्याचे काम केले असून, शाश्वत फॅशनचा तो केंद्रबिंदू आहे. डिझायनर्सनी केलेल्या कलाकृती उत्तम असल्याचे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीता वर्मा यांनी म्हटले आहे.

Exit mobile version