Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोविड नियमांचं पालन करत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

मुंबई (वृत्तसंस्था) :छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभर पोहचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू असं आश्वासन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या, शिवनेरी किल्ल्यावर पारंपरिक पद्धतीनं मोजक्या लोकांच्या उपस्थितीत काल शिवजन्म सोहळा झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार युवराज संभाजी छत्रपती, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या सोहळ्याला उपस्थित होते. राज्यभरात काल सर्वत्र कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून छत्रपती शिवाजी महाराजांना ३९१व्या जयंतीनिमित्तानं अभिवादन करण्यात आलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत शिवाजी पार्क इथं तर विधान भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. शहरातल्या क्रांतीचौक इथं शिवरायांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. बजाज कामगार संघटनेनं शिवनेरीवरुन आणलेल्या शिव ज्योतीचं पूजन यावेळी करण्यात आलं.

गडवाट संघटनेच्या वतीनं या ठिकाणी किल्ले शिवनेरीची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती.  जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवर, आर आर पाटील फांऊडेशनच्या वतीनं हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ.

प्रमोद येवले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी प्र-कुलगुरु श्याम शिरसाट यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, शिवराय ही महाराष्ट्राची सुरक्षित ठेव असून प्रत्येकाने महाराजांचा हा उज्ज्वल इतिहास समर्थपणे पुढे नेण्याचे काम करावं, असं आवाहन प्रख्यात इतिहासतज्ज्ञ आणि शिवचरित्राचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ.इस्माईल पठाण यांनी केलं आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं डॉ पठाण यांचं ‘शिवरायांची राजनीती, रणनीती आणि धर्मनीती’ या विषयावर काल ऑनलाईन व्याख्यान झालं, त्यावेळी ते बोलत होते.

लातूर इथं शिवप्रेमींनी कोविड नियमाचं पालन करत, शिवजयंती उत्साहाने साजरी केली. आमदार धीरज देशमुख यांनी शिवाजी चौक इथं महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. ग्रीन लातूरच्या वतीनं हरित प्रभात फेरी काढण्यात आली.

महाराजांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त शहीद उद्यान, पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात ३९१ शोभिवंत फुलझाडं लावण्याच्या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. जालना शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी झाली.

विविध पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड इथं सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन केलं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीत शिवजयंती निमित्त घेतलेल्या कार्यक्रमात अपंग कल्याण निधीतून ५ टक्के आरक्षित रक्कम ७५ अपंगांना वाटप करण्यात आली. या सर्वांना प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण दीड लाख रुपये वाटप करण्यात आलं.

कळमनुरी इथं वकील संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं. परभणी शहरासह जिल्ह्यात विविध पक्ष, संघटनांच्या वतीनं शिवरायांना अभिवादन करण्यात आलं. शनिवारबाजारातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

फेटेधारी ध्वजधारी युवक-युवती, पारंपारिक वेषभुषेतले गोंधळी, भजनी मंडळं, आणि शिवप्रेमी या मिरवणुकीत सहभागी झाले. शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारीत एक सजीव देखावा शोभायात्रेत लक्षवेधी ठरला.

जिंतूर इथं राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या आगारात विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा काल शिवजयंतीचं औचित्य साधून सत्कार करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं काल तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात आली होती.

उस्मानाबाद इथं शिवाजी महाराजांच्या प्रतिमा तसंच पुतळ्यांना अभिवादन करण्यासह श्री साई परिवाराच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. अनेक शिवप्रेमींनी यावेळी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं शिवाजी चौकात ध्वजारोहण आणि अन्य उपक्रमांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. कोविड काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version