Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात परदेशी कोरोनाचा प्रकार अद्याप आढळलेला नाही – डॉ. मुरलीधर तांबे

पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या ससून सर्वोपचार रुग्णालयात जनुकीय बदल चाचण्या सुरू करण्यात आल्या असून, यामध्ये ब्राझील, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेन यात आढळला नसल्याचं बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले.

तपासणी अंती सापडलेला स्ट्रेन हा ‘स्थानिकच असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. आजपर्यंत पुण्याच्या ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था’ आणि बंगळुरू मधील एका संस्थेमध्ये या चाचण्या केल्या जात होत्या.

मात्र त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. अशा परिस्थितीत पुण्यासह, अमरावती, यवतमाळ आणि सातारा या चार ठिकाणी करोनाचे रुग्ण वाढत असून, तेथील ‘जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट’ ससूनमधील प्रयोगशाळेत करण्यासंबंधीच्या सूचना वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिल्या.

त्यानुसार ससूनमधील तीन संशोधक डॉक्टरांना बंगळुरू येथे पाठवून याचे प्रशिक्षण देण्यात आले.यामध्ये पुण्यातील १२ तर अन्य जिल्ह्यांतील प्रत्येकी चार, असे २४ नमुने घेण्यात आले.

चारही ठिकाणी ब्राझील, ब्रिटन किंवा दक्षिण आफ्रिका येथील स्ट्रेन आढळून आले नाही. मात्र, पुणे सोडून अन्य ठिकाणी ‘लोकल जिनोम सिक्वेन्सिंग’ आढळले आहेत. एकूणच परदेशांतील म्युटेशन झालेले कोणतेच स्ट्रेन आढळले नसून, त्यांच्यात ‘लोकल’ म्हणजे भारतीय स्ट्रेनच दिसल्याचे, डॉ. तांबे आणि उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.

पुण्यातील ससून रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिली मात्रा घेतल्यानंतर ससून रुग्णालयातील एक परिचारिका आणि कर्मचारी अशा दोघांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आलेय.

आणखी एका घटनेत ससून रुग्णालयात पहिली मात्रा घेतल्यानंतर एकाला चार दिवसांनी, तर दुसऱ्या व्यक्तीला सात दिवसांनी करोना संसर्ग झाला. मात्र, त्यांची प्रकृती उत्तम आहे. लसीकरणाची पहिली मात्रा घेतली तरी त्या व्यक्तीला संसर्गापासून पूर्ण संरक्षण मिळत नाही.

लसीच्या दोन मात्रा घेतल्यानंतर १५ दिवसांनी त्यांच्या शरीरात प्रतिपिंड तयार होतात. लसीकरणामुळे हा संसर्ग झाला नाही. मात्र, साधारणतः पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर होणारा हा संसर्ग आहे,’ अशी माहिती बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली.

लस घेतल्यानंतरही  मास्क वापरणे, हात धुणे, सुरक्षित वावर यांसारख्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर त्वरित आपण सुरक्षित होत नाही. ‘सीरम’ ची लस सुरक्षित असली, तरी ती ७५ टक्के संरक्षण देते. त्यामुळे विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे, असंही डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले.

Exit mobile version