संरक्षण सामुग्रीबाबत आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण सामुग्रीबाबत आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. संरक्षण क्षेत्रात देश स्वयंपूर्ण व्हावा यासाठी स्वदेशी संरक्षण उत्पादनांचं संशोधन, आरेखन, नव्या कल्पना आणि निर्मीतीमधे खासगी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतं असं त्यांनी सांगितलं. ते आज ‘केंद्रीय अर्थसंकल्पातल्या संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावर आयोजित वेबिनारमधे बोलत होते. आपला देश फक्त आयातदार न राहता निर्यातदार झाला पाहिजे, त्यासाठी सरकार संरक्षण तंत्रज्ञान सामुग्रीच्या स्वदेशी निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. यातून स्टार्टअप तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रालाही चालना मिळेल असं ते म्हणाले.