Site icon साप्ताहिक एकच ध्येय

समता फाउंडेशनच्या कार्याला राज्यपालांची शाबासकी; युगांडा आणि झिम्बाब्वेचे मानद वाणिज्यदूत सन्मानित

मुंबई: अजंता फार्मा तसेच समता फाऊंडेशनच्या वतीने राज्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागात आरोग्यसेवा, कुपोषणमुक्ती, शिक्षण या क्षेत्रात केले जात असलेले सेवाकार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

समता फाऊंडेशनचे विश्वस्त तसेच युगांडा देशाचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत मधुसूदन अग्रवाल यांचा राज्यपालांच्या हस्ते कोरोना काळातील जनसेवेबद्दल राजभवन येथे आज सत्कार करण्यात आला.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, समाजसेवेचे कार्य सेवाकर्त्याला आत्मिक शांती आणि समाधान मिळवून देणारे असते. त्यामुळे कितीही अडचणी आल्या, तरी समाजसेवेचे व्रत सातत्याने जोपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते झिम्बाब्वेचे मानद वाणिज्यदूत तसेच समता फाऊंडेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल यांचादेखील प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

समता फाऊंडेशनच्या वतीने राज्यात आणि विशेषतः आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये अन्नधान्य, भोजन, मास्क, सॅनिटायझर, औषधी वाटप यांसह आदिवासी मुलांना संगणक प्रशिक्षण आदी अनेक उपक्रम राबविले जात असल्याची माहिती संस्थेचे अधिकारी तानाजी गोंड यांनी दिली.

रवि अग्रवाल, रिचा अग्रवाल, दिपक लोया, प्रियंका घुले, विशाल सरिया, आयुष अग्रवाल यांचा देखील यावेळी प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Exit mobile version