Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

निकालाची माहिती जलद गतीने मिळण्यासाठी विविध सुविधा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या उद्या दि. 23 मे रोजी राज्यामध्ये होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलद गतीने होण्यासाठी संकेतस्थळ, मोबाईल ॲप,मतदार मदत क्रमांक, टोल फ्री क्रमांक आदी विविध पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

लोकसभा निवडणूक 2019 च्या राज्यात उद्या होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. 48 लोकसभा मतदार संघांच्या मतमोजणीसाठी 38 ठिकाणी मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी सुमारे 1 लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 50 हजारांवर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यातील पोलीस बलाला सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी 23 मे 2019 रोजी फेरी पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. निवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखीखाली मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार राज्यात मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली आहे. राज्यात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

जनतेला निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी विविध सुविधा करुन दिल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्याhttps://ceo.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर हा निकाल पाहण्यास मिळणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या https://results.eci.gov.in या संकेतस्थळावर निवडणूक निकाल पाहता येणार आहे. Voter Helplineया आयोगाने उपलब्ध करुन दिलेल्या मोबाईल ॲपवरही निकाल पाहता येणार आहेत.

1950 या टोलफ्री क्रमांकावर आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या व 24 तास कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षातील 022-22040451 / 54 या क्रमांकावर देखील निवडणूक निकालाची अद्ययावत माहिती मिळणार आहे.  मंत्रालयामध्ये माध्यम प्रतिनिधींना निवडणूक निकालाची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून हा नियंत्रण कक्ष देखील 24 तास कार्यरत राहणार आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण, मुख्य गेट,गार्डन गेट आणि मंत्रालयासमोरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या डिजिटल होर्डींगवर देखील निकालाची माहिती मिळणार आहे.

मुंबई शहरातील वाहतूक विभागाच्या डिजिटल साईन बोर्डवर देखील निकालाची माहिती प्रदर्शित करण्याचा विचार होता. मात्र, यामुळे वाहतूक व्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले.

जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी हे जनतेला निकालाची फेरीनिहाय माहिती देणार आहेत, अशी माहितीही श्री. शिंदे यांनी दिली.

ईव्हीएम तक्रारींसाठी आयोगाचा नियंत्रण कक्ष

इव्हीएमसंदर्भात होणाऱ्या तक्रारींसाठी भारत निवडणूक आयोगाने नवी दिल्ली येथे नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. स्ट्राँगरुममध्ये इव्हीएमची साठवणूक, स्ट्राँगरुमची सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही संनियंत्रण आदी तसेच मतमोजणीदरम्यान इव्हीएमशी संबंधित कोणतीही तक्रार असल्यास आयोगाच्या 011- 23052123 या क्रमांकावर दाखल करता येईल.

Exit mobile version