Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारतीय आरोग्य परीसंस्थेकडे नव्या विश्वासार्हतेने पाहिले जात असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने आरोग्य क्षेत्रात नवी पद्धत रूढ केली असून इतर राष्ट्रांनाही या क्षेत्रात सहाय्य केले आहे. भारतीय आरोग्य परीसंस्थेकडे नव्या दृष्टीने, नव्या आदराने आणि विश्वासार्हतेने पाहिले जात आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तमिळनाडूमधल्या डॉक्टर एम. जी. आर. वैद्यकीय विद्यापीठाच्या ३३ व्या पदवी प्रदान समारंभात पंतप्रधानांनी आज दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

सध्या भारतीय वैद्यकीय व्यावसायिकांसाठी, शास्त्रज्ञांसाठी तसेच औषध व्यावसायिकांसाठी कौतुकाची आणि आदराची भावना असतानाच तुम्ही या क्षेत्रात पदवी संपादन करत आहात असे ते विद्यार्थ्यांना म्हणाले.

या संस्थेच्या यशाने एम जी आर यांना आनंद होईल. गरिबांसाठी अनुकंपा असणारे असे त्यांचे शासन होते. आरोग्य, शिक्षण तसेच महिला सबलीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय होते.

गंभीर दिसणे आणि गंभीर असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांनी डॉक्टर म्हणून काम करताना त्यांचा विनोदी स्वभाव जपावा अशी विनंती पंतप्रधानांनी केली. यामुळे रुग्णांना बरे होण्यास आणि रुग्णांचे मनोबल वाढवण्यास मदत होईल असे ते म्हणाले.

तमिळनाडू चे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित या समारंभात उपस्थित होते. १७ हजार ५९१ विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या.

Exit mobile version