भारत आणि पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेषा आणि इतर भागातील युद्धविराम कराराचे संयुक्त राष्ट्र सभेकडून स्वागत
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या नियंत्रण रेषा आणि इतर भागातील युद्धविराम कराराचे संयुक्त राष्ट्र सभेचे अध्यक्ष वोल्कन बोझ्कीर यांनी स्वागत केले आहे.
दोन्ही देशांनी शाश्वत शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आपापसातले प्रश्न सोडवण्यासाठी केलेला हा करार अन्य देशांसाठी सामंजस्याचे उदाहरण ठरेल असे बोझ्कीर यांनी म्हटले आहे. या करारामुळे संयुक्त राष्ट्र सभेची मूल्य अधोरेखित होतात असेही त्यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे.
थेट संपर्कासाठीची यंत्रणा सुरू करण्याच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांत चर्चा झाल्याचे भारत आणि पाकिस्तानने काल जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
सीमाभागात शांतता राखली जावी, यासाठी हिंसाचाराला उद्युक्त करणाऱ्या वादाच्या विषयांवर चर्चेने तोडगा काढण्यावर तसेच सीमारेषेवर शस्त्रसंधीसह अन्य करारांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.