मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी एका ध्येयानेपुढे जाऊ या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने विधानमंडळाच्या वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभागानं संयुक्तपणे आयोजित केलेल्या परिसंवादात ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. जगभरातले अनेक देश आपल्याच मातृभाषेत व्यवहार करता, अनेक नेते दुभाषकाला सोबत घेऊनच फिरतात, मात्र आपण आपली भाषा वापरायला कमी पडतो.
आपल्यातला हा न्युनगंड जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत मराठी भाषेला तीचा गौरव मिळू शकणार नाही असं त्यांनी सांगितलं.आपली मातृभाषेचा गौरव जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले. आजच्या परिस्थितीत इंग्रजी भाषा यायला हवी पण त्यामुळे मराठी भाषा कमकुवत होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. भाषा आणि संस्कृती या परस्परांना पुरक आहेत असं ते म्हणाले.
विधान परिषेदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते.