बाल मानसशास्त्राच्या अनुरूप खेळणी तयार करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरणाला अनुकूल आणि बाल मानसशास्त्राच्या अनुरूप खेळणी तयार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पहिल्या टॉय फेअर २०२१ चे पंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे काल उद्घाटन केले त्यावेळी ते बोलत होते.
चन्नापटना, राजस्थान, वाराणसी इथल्या टॉय क्लस्टरमधील खेळणी निर्माते आणि कारागिरांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. खेळणी कारागिरांच्या समस्या आणि गरजा त्यांनी जाणून घेतल्या. आणि खेळणी उद्योगात नावीन्य आणि कल्पकता आणण्यासाठी मार्गदर्शनही केले.
मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी पर्यावरणपूरक, पुनर्वापर करता येऊ शकणारी खेळणी भारतीय उत्पादकांनी तयार करावीत, परंपरेकडे दुर्लक्ष न करता नव्या प्रकारची खेळणी निर्माण करावीत, खेळण्यांची ऑनलाइन मंचांवरून विक्री करण्याचे प्रयत्न करावेत असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
पिढ्यांगणिक आवडीनिवडी बदलत जातात त्याप्रमाणे खेळणी निर्मात्यांनी परिवर्तनाची कास धरण गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जाहिरात विश्वात कठपुतळीसारख्या खेळांचा वापर होऊ शकेल.
मुलांच्या सर्वांगीण विकासात खेळणी महत्वाची भूमिका बजावतात. मुलांना जसे आपण अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतो तसेच मुलांबरोबर पालकांनी खेळलेही पाहिजे. मुलांच्या भावविश्वाशी असलेला खेळण्यांचा संबंध पालक आणि शिक्षकांनी समजून घेतला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.