Site icon साप्ताहिक एकच ध्येय

६० वर्षांवरील व्यक्ती आणि सह-विकार असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींचे कोरोना लसीकरण उद्यापासून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या आणि सहविकार असलेल्या ४५ वर्षांच्या वरील व्यक्तींना उद्यापासून लस देण्यास सुरुवात होणार आहे. या मोहिमेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली नियोजित असून पात्र व्यक्ती थेट चाचणी केंद्रावर जाऊनही लसीकरणासाठी आपले नाव नोंदवून लस टोचवून घेऊ शकतात, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

लसीकरणाच्या या टप्प्यात खाजगी रुग्णालयांमध्येही कोरोना लस दिली जाणार असून लशीच्या प्रत्येक मात्रेसाठी जास्तीत जास्त अडीचशे रुपये आकारण्याची परवानगी या रुग्णालयांना देण्यात आली आहे.

१० हजार सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत दिली जाणार असून २० हजार खाजगी रुग्णालयांना लसीकरण मोहीम राबवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

लसीकरण केंद्र म्हणून सर्व सार्वजनिक आरोग्य केंद्रांचा, तसेच राज्य आरोग्य विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयांचा वापर करण्याचे राज्य सरकारांना स्वातंत्र्य देण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातल्या आरोग्य सचिवालयांशी काल संवाद साधत तयारीची माहिती घेतली.

खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठीचे पैसे इलेक्ट्रॉनिक आणि वित्त व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत.

लसीकरणाची क्षमता आणि वेग वाढवण्यासाठी अनेक खासगी आरोग्य सुविधांना मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. याशिवाय, सरकारच्या नियंत्रणाखालील वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये, जिल्हा, उपविभागीय रुग्णालये आणि आरोग्य उपकेंद्रे यांचाही लसीकरण केंद्र म्हणून वापर केला जाणार आहे.

सर्व लसीकरण केंद्रांवर कोरोना नियमांचे आणि लसीकरण प्रक्रियेचं अत्यंत काटेकोर पालन करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version